अलिबाग : रायगड जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रीया नुकतीच पार पडली आहे. मात्र शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यातील जवळपास १ हजार शिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ६०० पदे रिक्त होती. ज्यापैकी ७१९ पात्र उमेदवारांची भरतीसाठी शिफारस करण्यात आली. यात मराठी माध्यमाच्या ६७१ तर उर्दू माध्यमाच्या ४८ शिक्षकांचा समावेश होता. या पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया आणि समुपदेशन प्रक्रिया नुकतीच पार पडली. ज्यासाठी ५३२ पात्र उमेदवार हजर होते. त्यांना ५३२ शाळांवर समुपदेशन प्रक्रीयेद्वारे नियुक्ती देण्यात आली. म्हणजेच शिक्षकांच्या १ हजार ६०० रिक्त पदांपैकी केवळ ५३२ पदे प्रत्यक्ष भरली गेली.
हेही वाचा : Vasant More: “मर्यादेबाहेर त्रास सहन केला, आता..”, वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
जिल्ह्यात अजूनही शिक्षकांची १ हजारहून अधिकपदे रिक्त राहणार आहे. भरती प्रक्रियेमुळे साडेपाचशे पदे भरली गेल्याने शिक्षण विभागाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाची चांगलीच ओढाताण होण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती. ही कमतरता या शिक्षक भरतीत भरून निघालेली नाही. केवळ उर्दू माध्यमासाठी केवळ ४८ शिक्षकांची शिफारस करण्यात आली होती. प्रत्यक्ष मात्र हजर झाले. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या शाळांची शिक्षक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुक्यात गेल्या वर्षभरापासून मराठी माध्यमाचे शिक्षक उर्दू शाळेवर शिकवत आहेत. त्यामुळे ५३२ शिक्षकांच्या भरतीनंतर ग्रामीण भागातील शाळा शिक्षकांपासून वंचित राहणार आहेत.
हेही वाचा :निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय; सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न
जिल्हा बदलीसाठी २१२ जणांचे अर्ज…
जिल्ह्यात शिक्षकांची हजारहून अधिक पदे रिक्त असतांनाच, २१२ शिक्षकांनी जिल्हा बदलीसाठी अर्ज केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे. २१२ शिक्षक बदली करून इतर जिल्ह्यात जाणार असून, त्याबदल्यात केवळ ४८ शिक्षक रायगड जिल्ह्यात बदली करून येणार आहेत. तसे झाल्यास शिक्षकांच्या रिक्त पदाच्या संख्येत आणखी १५० ची भर पडणार असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षक भरतीत नव्याने भरती झालेल्या शिक्षकांना पहिल्यांदा शुन्य शिक्षकी शाळांवर नियुक्ती दिली जाईल, त्यानंतर उरलेल्या शिक्षकांना एक शिक्षकी शाळांवर नियुक्ती दिली जाईल. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होईल असा आमचा प्रयत्न राहील.
सत्यजित बढे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप.