अलिबाग : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषदांच्या निवडणूकीच्या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या १० नगरपरिषदांमध्ये २ लाख ३७ हजार ५०३ मतदार अपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बुधवारी (दि. ५) पत्रकार परिषदेत दिली.
रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, श्रीवर्धन, मरूड – जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगरपरिषदांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान होईल. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. दहा नगरपरिषदांमध्ये १०७ प्रभाग असून २१७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. ३०८ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे.
मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत. १० नगरपरिषदांच्या निवडणूकीत २ लखा ३७ हजार ५०३ मतदार मतदान करतील. मतदार यादी तपासताना ४ हजार १५६ मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळले आहे. नाव दुबार असले तरी त्यांना मतदान करण्याची संधी देण्यात येणार आहे. मतदान करण्यापूर्वी मतदाराकडून आपण अन्य कुठेही मतदान केले नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी दिली.
रायगड जिल्ह्यात खोपोली ही एकमेव ब वर्ग नगरपरिषद आहे. उरलेल्या ९ नगरपरिषदा क वर्ग आहे. खोलीमध्ये सर्वाधिक ६२ हजार ७४ मतदार आहेत. येथे ३१ सदस्य निवडून येणार आहेत. त्या खालोखाल पेणमध्ये २४ तर उरण व कर्जत मध्ये प्रत्येकी २१ सदस्य निवडून येणार आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड, रोहा, महाड, माथेरान या नगरपरिषदांमध्ये प्रत्येकी २० सदस्य निवडले जाणार आहेत, अशी माहिती किशन जावळे यांनी दिली.
