रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण विभागातील विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात तळ ठोकून बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास या मतदार संघातील मतदानाची गणिते बदलण्याची आणि विद्यमान आमदारांना ही निवडणूक आणखीच जड जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात वंचित बहुजन आघाडीने विविध अठरा पगड जाती-धर्माच्या उमेदवारांना वेळोवेळी संधी दिलेली आहे. यातच वंचित कडून आता रत्नागिरी दक्षिण भागात विधानसभेच्या तिन्ही जागांवर उमेदवार उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या दुसऱ्या उमेदवार यादीत दहा मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ३० नवीन उमेदवारांचा समावेश आहे, ज्यात विविध जाती-जमातींच्या लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत वंचितने एकूण ५१ उमेदवारांची नावे जाहीर केलेल्या या यादीत उमेदवारांच्या नावांसह त्यांच्या जातीचाही उल्लेख आहे करण्यात आला आहे. ज्यामुळे सर्वसमावेशक संघटना असल्याचे दिसून येऊ लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात देखील परिवर्तनवादी मतदार मोठ्या संख्येने आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात सध्या राजापूर लांजातून शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी, चिपळूणमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शेखर निकम, तर रत्नागिरीतून शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत असे तीन आमदार आहेत. यातील उदय सामंत हे शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटात सामील झाले. तर शेखर निकम राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात सामील झाले. आमदार राजन साळवी हे ठाकरे गटात कायम आहेत. परंतु या तिन्ही आमदारांविरोधात त्यांच्याच मतदारसंघात नाराजीचा सुर मोठा आहे.

हेही वाचा : सातारा: रक्कम लांबविण्याचा बनाव पोलिसांकडून उघडकीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्वांना शह देण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीच्या माध्यमातून आपले मोहरे या विधानसभा निवडणुकीसाठी उतरवणार असल्याची दाट शक्यता आहे. यासाठी जिल्हा कमिटीवरील पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. यात जिल्ह्यात उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अजूनही कोणी इच्छुक असल्यास येत्या चार दिवसात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महासचिव मुकुंद सावंत यांनी केले आहे. मात्र वंचितने रत्नागिरी दक्षिण मधून उमेदवार उभे केल्यास विद्यमान राजकिय पक्षांतील उमेदवारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदारांना आता या वंचितची देखील धास्ती वाटू लागल्याची चर्चा आहे. तसेच वंचित आघाडीने आपले उमेदवार उभे केल्यास रत्नागिरीतील राजकीय गणिते देखील बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.