रत्नागिरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आले नेते वैभव खेडेकर यांचा भाजपातील पक्षप्रवेश एकदा लांबणीवर पडला आहे. या पक्षप्रवेशाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यात खेडेकर यांचा भाजपातील पक्षप्रवेश चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. भाजपाच्या नेत्यांनी या पक्षप्रवेशाकडे पाठ फिरवल्याने वैभव खेडेकर यांच्याबरोबर गेले कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत. आपला पक्षप्रवेश झाला नसला तरी कोकणात वैभव खेडेकरांची काय ताकद आहे? हे आज आपण दाखवण्याचे काम केले असल्याचे मत वैभव खेडेकर यांनी व्यक्त केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडेकर यांची काही दिवसापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. वैभव खेडेकर यांचे भाजप नेत्यांशी वाढलेल्या जवळकीमुळे त्यांना पक्षाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. वैभव खेडेकर यापूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. त्याचा भाजप पक्ष प्रवेश चार सप्टेंबरला आयोजित करण्यात आला होता. मात्र भाजप नेते खासदार नारायण राणे आजारी पडल्याने व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असल्याने हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर नियोजित वेळेनुसार २३ सप्टेंबर रोजी पुन्हा वैभव खेडेकर यांचा भाजपमधील पक्ष प्रवेशआयोजित करण्यात आला होता. मात्र तोही आता लांबणीवर पडल्याने कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत.
या पक्ष प्रवेशासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ४० ते ५० गाड्यांचा ताफा मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल झाला होता. मात्र या पक्षप्रवेशाला भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागले. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी वैभव खेडेकर यांच्यासह माजी आमदार सूर्यकांत दळवी व डॉ. विनय नातू तेच भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले होते. मोठ्या उत्साहात हा पक्षप्रवेश होण्याची अपेक्षा असताना भाजप कार्यालयातील शुकशुकाटामुळे पुन्हा एकदा वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. दोन वेळा भाजपातील पक्षप्रवेश लांबणीवर गेल्याने याची राजकीय वर्तुळात चांगलिच चर्चा होऊ लागली आहे.
या पक्षप्रवेशाबाबत भाजप नेत्यांनी भाष्य करणे ही टाळले आहे. मात्र याविषयी बोलताना खेडेकर यांनी आपला भाजप पक्ष प्रवेश झाला नसला तरी आज पासून आपण भाजपाचे काम सुरू केले आहे. गेली २० वर्ष मनसे वाढवण्याचे काम कोकणात केले असून आता यापुढे भाजपासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही विरोधकांनी खेड व्यतिरिक्त वैभव खेडेकर यांचे कुठेच अस्तित्व नसल्याची वल्गना केली होती. यावर उत्तर देताना वैभव खेडकर म्हणाले, आज पक्ष प्रवेश होणार नव्हता हे मला माहीत होते, पण ठरलेल्या वेळेनुसार माझे समर्थक कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यामुळे अशा विरोधकांना मुंबईत येऊन आपली ताकद दाखविणे गरजेचे होते.
एवढ्या मोठ्या गाड्यांचा ताफा बघून विरोधक समजून गेले असतील की, वैभव खेडेकर म्हणजे कोकण आहे. माझ्या पक्षप्रवेशाचे धास्ती विरोधकांनी घेतली असावी, त्यामुळे पक्ष प्रवेशात अडथळे येत असल्याचे मत देखील खेडेकर यांनी व्यक्त केले आहे.
भाजपमधील वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त पुन्हा एकदा चुकल्यानंतर रात्री उशिरा वैभव खेडेकर आणि भाजपमधील काही मोजक्याच नेत्यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या डोंबिवली येथील निवासस्थानी चर्चेसाठी बोलावणे केले आहे. या बैठकीमध्ये वैभव खडेकरांच्या पक्षप्रवेश बाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र खेडेकर यांच्या भाजप प्रवेशावर येणाऱ्या अडचणी मागे विरोधकांची लॉबी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप मधील वैभव खेडेकरांचा हा पक्ष प्रवेश आता केव्हा होणार? याकडे सर्व कोकण वासियांचे लक्ष लागले आहे.