सांगली : कृषी सेवा केंद्रामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असून याबाबत आंदोलन मागे घेण्यासाठी तथाकथित संघटनेच्या नावावर खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला असून तक्रार दाखल होताच अध्यक्षांसह तिघांना अटक करण्यात आली. मुकुंद जाधवर हे कृषी विभागात कार्यरत असून त्यांच्या वेगवेगळ्या शेती कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे सात ते आठ कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. याविरूध्द जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले.
हेही वाचा : शरद पवारांशी नित्य संपर्काचा प्रफुल्ल पटेलांचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला
जाधवर यांना भेटून आंदोलन मागे घेण्यासाठी १५ लाखांची खंडणी मागण्यात आली. यापैकी एकाने साडेसात लाख रूपयेही घेतले. मात्र, यानंतर खंडणीची रक्कम दिली नाही तर तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकास जिवंत ठेवणार नाही, अनूसुचित जाती जमाती संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करू अशी धमकीही दिली. जाधवर यांच्या फिर्यादीनुसार स्वाभिमानी स्वराज संघटनेचा प्रमुख प्रशांत सदामते, विनोद मोरे, विठ्ठलराव जाधव आणि लता जाधव या चौघांविरूध्द सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.