सांगली : सोमवती अमावस्येला अंधश्रध्देतून लिंबाच्या झाडाला जिवंत बोकड उलटे टांगण्याचा प्रकार कवलापूर ता. मिरज येथे उघडकीस आला असून आठ दिवसांनी या बोकडाचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली. अद्याप उलटा टांगलेला मृत बोकड झाडावरच असून तो उद्या (सोमवारी) खाली घेण्यात येणार आहे.

सांगलीपासून दहा किलोमीटर अंतरावरील कवलापूरमध्ये रस्त्याकडेच्या एका लिंबाच्या झाडाला दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणीतरी अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड आणून त्याचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते. आठवडाभर ते बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे त्या बोकडाचा तडफडून मृत्यू झाला आहे. ही घटना कवलापूर येथील जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीला कळवली. तातडीने अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, फारुख गवंडी यांनी जाऊन या घटनेची पाहणी केली.

हेही वाचा : “तुमच्या रक्तात राष्ट्रावादी, हृदयामध्ये भाजपा आहे, आता किडनीमध्ये…”; ओमराजे निंबाळकर यांचा मल्हार पाटलांना टोला

आठवडाभर बोकड उलटे टांगलेल्या स्थितीत राहिल्यामुळे त्याचा तडफडून मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार अमावस्येच्या रात्री ज्याप्रकारे केला आहे, यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतो. आजूबाजूच्या शेतकर्‍यांकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की पाडव्याच्या आदल्या दिवशी असणार्‍या सोमवती अमावस्येच्या रात्री एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती. त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या पूर्वी ही कवलापूरमध्ये मागील महिन्यात कवलापूर येथील रसूलवाडी रोडवर असाच झाडाला बोकड उलटे टांगून अघोरी प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता.

हेही वाचा : सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झाडाला असे उलटे जिवंत बोकड टांगून त्याचा बळी देण्याचा अघोरी प्रकार पहिल्यांदाच आम्ही पाहत आहे असे अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी यांनी सांगितले. कोणीतरी मांत्रिकाच्या किंवा देवर्षीच्या सांगण्यानुसार हा अमावस्येच्या दिवशी प्रकार केला असावा असे वाटते. याबाबत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. तसेच कवलापूर गावच्या सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील यांनाही कल्पना दिली आहे.