सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना सांगलीजवळ हरिपूर येथे भानामतीचा प्रकार केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकाराचा परस्पर विरोधी गटांनी निषेध केला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ८० ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी मतदान होत आहे.

सांगलीलगत असलेल्या कृष्णा-वारणा संगमावरील हरिपूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज प्रचाराची सांगता होत असतानाच गावच्या दगडी स्वागत कमानीलगत भानामतीचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. गावची वेस बांधीव दगडी असून या कमानीलगत लिंबू, हळदीकुंकू, टाचण्या टोचलेल्या बाहुल्या आदी वस्तू आढळून आल्या आहेत. लगतच असलेल्या लाल कापडावर दुरडी लगत या बाहुल्या ठेवण्यात आल्या होत्या. तसेच एका नारळाला बाहुली बांधून तिची पूजा केल्याचेही दिसून आले.

हेही वाचा : जातीच्या दाखल्यात फेरफार केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

अंधश्रध्देचा हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली. परस्पर विरोधी गटांनी एकमेकांवर जादूटोण्याचा आरोप करीत पराभूत मानसिकेतेतून अज्ञातांकडून हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही मंडळींनी अशा अंधश्रध्दांना सुशिक्षित पिढी थारा देत नाही, असे सांगत या वस्तू जाळून नष्टही केल्या.

हेही वाचा : “फडणवीसांना गृहखातं झेपत नसल्याचा आणखी एक पुरावा…”, सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, “छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले. तर ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ८० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २१८ तर सदस्य पदांसाठी ६६४ जागांसाठी १ हजार ५०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रविवार रोजी मतदान होणार असल्याने गावागावांत धुमशान सुरु आहे. रविवारी या ठिकाणी मतदान होत असून मतदानाची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. आज प्रचाराची सांगता झाली असून कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. प्रचाराची सांगता झाल्यानंतर गावपातळीवर भावकी, गावकीच्या जोरावर मतांची बेजमी करण्याचे प्रयोग सुरू झाले असून गुप्त बैठकांचा उद्या रात्रीपर्यंत जोर राहणार आहे.