सांगली : वीज दरवाढीने औद्योगिक वापराच्या पाण्याचे दर १७ टक्के वाढले असून, याची अंमलबजावणी चालू महिन्यापासून करण्यात येणार आहे. तशा नोटिसा औद्योगिक महामंडळाकडून उद्योजकांना पाठविण्यात आल्या आहेत. अगोदरच वीज दरवाढीने हैराण झालेल्या उद्योगावर आणखी एक संकट आले असल्याचे न्यू इंडिया पार्कचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी शुक्रवारी सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आकारला जात असलेला प्रति एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर पाण्याला १६ रुपये होता. या दरात तब्बल १७ टक्के वाढ केली आहे. हा दर आता १८.७५ रुपये प्रती घनमीटर असा केला आहे. या दरवाढीबाबत महामंडळाने नुकतीच सर्व उद्योजकांना पत्रे पाठवली असून, ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू होत असल्याचे सप्टेंबर महिना सुरू झाल्यावर कळविले आहे.

या पत्रामध्ये सदरची दरवाढ ही राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाने वाढविलेली पाणीपट्टी व वीज नियामक आयोगाच्या मान्यतेने वाढलेल्या वीज दरामुळे करावी लागत असल्याचे नमूद केले आहे. नुकत्याच झालेल्या वीज दरवाढीतून राज्यातील उद्योग क्षेत्र सावरण्यापूर्वीच एमआयडीसीने पाणीदरवाढीचा आणखी एक दणका दिला आहे. यामुळे राज्यातील उद्योगक्षेत्राचा बुडता पाय आणखी खोलात जाणार आहे.

एमआयडीसीने वाढलेली भांडवली गुंतवणूक व खर्चाचे कारण देऊन उद्योजकांवर एकतर्फी दरवाढ लादली आहे. परंतु, उद्योगक्षेत्रातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरची कमाल गुणवत्ता व किमान विक्री किंमतीची प्रचंड स्पर्धा तसेच अमेरिकेने वाढविलेल्या आयात कराने निर्यातीवर झालेल्या परिणामावर उद्योजकांच्या वाढलेल्या उत्पादन खर्चातील वाढ बाजारपेठेत कोणाकडून वसुल करायची, असा गहन प्रश्न उद्योजकांसमोर उभा ठाकला आहे. सबब या सर्व परिस्थितीचा विचार करता राज्य शासनाने ही पाणीदरवाढ रद्द करावी, अशी मागणी कार्वे औद्योगिक विकास केंद्रातील न्यू इंडिया टेक्सटाईल पार्कच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांना करण्यात आल्याचे किरण तारळेकर यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात उद्योगक्षेत्रातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रचंड स्पर्धा वाढली आहे. अमेरिकेने वाढविलेल्या आयात कराने निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. यातच नुकतीच वीज दरवाढ देखील केलेली असताना पुन्हा पाणी दरातही वाढ केल्याने उद्योजक हैराण झाले आहेत. उद्योजकांच्या वाढलेल्या उत्पादन खर्चातील वाढ बाजारपेठेत कोणाकडून वसुल करायची असा प्रश्न तारळेकर यांनी विचारला आहे.