सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मोदींसाठी घरोघरी फिरावे लागत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. इस्लामपूरमध्ये दोन दिवसांपुर्वी बावनकुळे यांनी जनसंवाद साधला होता, याचा संदर्भ घेत जयंत पाटील यांनी टीका केली. साखराळे येथे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी’ या उपक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, सरपंच सुजाता डांगे, राष्ट्रवादी सेवादलाचे साखराळे अध्यक्ष अविनाश पाटील, उपसरपंच बाबुराव पाटील आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून ‘मातोश्री’ची दारे तुमच्यासाठी उघडी असतील का? भरत गोगावले म्हणाले…
जयंत पाटील म्हणाले, ‘नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागणे, हे दुर्दैवी आहे. आमच्या काळात आम्ही औषधे खरेदीचे अधिकार संबंधित अधिकार्यांना दिले होते. या सरकारने ते अधिकार आपल्याकडे घेतले होते. आता आम्ही बोलू लागल्यावर सरकारने अधिकार्यांना औषध खरेदीचे अधिकार दिल्याचा नवा आदेश काढला आहे.’ दरम्यान प्रारंभी अविनाश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.