सांगली : मिरज वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारणीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून यामुळे गुतागुंतीच्या व्याधीवर उपचार करण्याची सोय मिरजेत होणार आहे, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
मिरजेतील शासकीय महाविद्यालयात १०० जागांचे परिचारिका महाविद्यालय सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली असून यानंतर आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीनंतर केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव केंद्रिय मंत्री मनसुख मांडविया आणि राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावाला केंद्र शासनाचीही मान्यता मिळेल असे मंत्री खाडे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : आग्रह झाला तरी लोकसभा लढवणार नाही – पालकमंत्री सुरेश खाडे
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ३६६ कोटी २६ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये २९ हजार चौरस फुटांवर चार मजली मुख्य इमारत, डॉक्टरांची निवास व्यवस्था, मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री यांचा समावेश आहे. तसेच सांगली-मिरज शहराला जोडणारा कृपामयी पूलावरून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत वाहतूक सुरूच ठेवण्यात येणार असून या पूलाला पर्याय म्हणून रेल्वेचा सहा पदरी पूल उभा करण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटींचा निधी रेल्वेमार्फत खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.