सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करावा आणि अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर व माजी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बॅकेवर आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी नोकरभरती, अनावश्यक खरेदी, कर्जवसुली याबाबत संचालक मंडळावर कारवाईची आग्रही मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात आली.

जिल्हा बॅकेत मागील संचालक मंडळाच्या कारभाराबाबत चौकशीमध्ये सुमारे ५० कोटींचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सध्या या रकमेच्या वसुलीसाठी तत्कालिन संचालक व अधिकारी अशा ४१ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याच बरोबर नोकरभरतीबाबतही आक्षेप घेण्यात आले आहेत. बड्या थकबाकीदारांवर वसुलीसाठी अपेक्षित कारवाई न करता सबुरीचे धोरण अवलंबले जात आहे. दुसर्‍या बाजूला शेतकरी वर्गाची कर्जासाठी अडवणूक होत असल्याचा आरोप यावेळी आ. पडळकर व खोत यांनी केला.

हेही वाचा : इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर निलेश लंकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणुकीत माझ्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकेचा कारभार शेतकरी हिताचा नाही, उलट बड्या व्यावसायिकांना कर्ज देउन शेतकर्‍यांना अडवण्याचा उद्योग केला जात असून हे संचालक मंडळ बरखास्त करावे, मागील अपहाराची केवळ वसुलीची कारवाई न करता संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी यावेळी मोर्चाच्यावतीने करण्यात आली. सांगलीतील स्टेशन चौक येथून मोर्चास सुरूवात झाली. जिल्हा बँकेपर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. मोर्चामध्ये ग्रामीण भागातून आलेले शेतकरी, रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच हलगीच्या कडकडाटासह आसूडचा आवाजही लक्ष्य वेधून घेत होता.