सांगली : ‘स्पेशल २६’ या हिंदी सिनेमातील कथानकाप्रमाणे प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करत कोट्यवधींची लूट करणारी टोळी सांगली पोलिसांनी उघडकीस आणून चौघांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुरुवारी सायंकाळी दिली. बनावट छापा टाकून लंपास केलेली १५ लाखांची रोकड आणि १ किलो ४६० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. या टोळीतील तिघे फरार आहेत.

कवठेमहांकाळमध्ये डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल नावाचे रुग्णालय आहे. रविवारी रात्री एका महिलेसह चौघेजण रुग्णालयात आले. आम्ही डॉक्टरांचे पाहुणे असल्याचे सांगत वरच्या मजल्यावर प्रवेश मिळवला. डॉक्टरांना बनावट ओळखपत्र दाखवून आम्ही प्राप्तिकर विभागाचे अधिकारी असून, तुमच्या घराची झडती घ्यायची आहे, असे सांगितले. तसेच त्यांनी याबाबतचा आदेशही दाखवला. डॉ. म्हेत्रे यांनीही अधिकारी असल्याचे समजून पूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घरातील तिजोरी, कपाट यांची पडताळणी करत घरात असलेली १५ लाख ६० हजारांची रोकड आणि एक किलो ४६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने लंपास केले होते.

हिंदी चित्रपट ‘स्पेशल २६’सारखा प्रकार सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये घडल्याने आणि एक कोटीहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती. या फसवेगिरीप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील एका तरुणीसह चौघांना कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतील घाटकोपर येथून ताब्यात घेतले.

या गुन्ह्यातील आरोपी दीक्षा राष्ट्रपाल भोसले (वय २५, रा. एफ-१, काकडे पार्क, चिंचवड), पार्थ महेश मोहिते (वय २५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) व साई दीपक मोहिते (वय २३, रा. प्रगतीनगर, पांचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर महेश रघुनाथ शिंदे (रा. जयसिंगपूर, सध्या रा. घाटकोपर, मुंबई), अक्षय लोहार (रा संकेश्वर, जि-बेळगाव), शकील पटेल (रा गडहिंग्लज जि. कोल्हापूर) आणि आदित्य मोरे (रा. रुकडी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे संशयित फरार आहेत.

संशयितांनी सांगलीत भाड्याने इनोव्हा मोटार घेऊन बनावट छापा टाकून लूट केली होती. संशयित पदवीधर असून, तरुणी गोव्यामध्ये काही काळ हॉटेलमध्ये काम करत होती. तिने हॉटेल व्यवस्थापनातील अन्नशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. या आव्हानात्मक गुन्ह्याचा सांगली पोलिसांनी अवघ्या ६० तासांत छडा लावला.