सांगली : दुषित पाणी सोडल्याने कृष्णेचे पाणी प्रदुषित केल्या बद्दल राजारामबापू, हुतात्मा आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्यांना ४ कोटी ४६ लाख रूपये पर्यावरण दंड प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून निश्चित करण्यात आला आहे. तर सांगली महापालिकेला लागू होणार्या दंडाची रक्कम मोठी असल्याने त्याची गणती करण्यासाठी मुदत मागण्यात आली असल्याचे याचिकाकर्ते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
कृष्णा नदीमध्ये दुषित पाण्यामुळे जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये लाखो माशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई व्हावी यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष फराटे यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी तज्ञांची समिती नियुक्त करून अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालानुसार पर्यावरण नुकसानीबाबत दंडाची रक्कम निश्चित करून तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश प्रदुषण नियंत्रण मंडळाला हरित न्यायालयाने दिले होते.
हेही वाचा : आजी-माजी राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट
या आदेशानुसार प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली असल्याची माहिती फराटे यांनी गुरूवारी दिली. हुतात्मा सहकारी साखर कारखाना साखर व मद्यार्क प्रकल्प यांना ९९ लाख, राजारामबापू सहकारी साखर कारखाना साखर व मद्यार्क प्रकल्प यांना एक कोटी १४ लाख ४० हजार आणि यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना यांना मद्यार्क व साखर विभागासाठी २ कोटी ३२ लाख ८० हजाराचा पर्यावरण दंड निश्चित करण्यात आला आहे. तसेच कृष्णा प्रदुषणास सांगली महापालिकाही जबाबदार असून महापालिकेने पर्यावरणाचे मोठे नुकसान केले असून त्याबद्दल होणार्या पर्यावरण दंडाची रक्कम मोठी असल्याने दंड निश्चित करण्यासाठी मुदत मागण्यात आली आहे.