सांगली : पोलिसांना जिवंत सोडायचे नाही, तू पिस्तूल घेउन ये, गोळ्या घालायच्या आहेत असे भ्रमणध्वनीवरून सांगत दोघांनी कोयत्याने पोलिसांवर हल्ला केल्याचा प्रकार किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे घडला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सोमवारी इस्लामपूर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इस्लामपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी जालिंदर माने हे अन्य सहकाऱ्यांसह शनिवारी किल्ले मच्छिंद्रगड येथे गस्त घालत असताना अचानक दोन व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत समोर आल्या. त्यांच्या घरात वडिलांना विजय साळुंखे याने डोकीस पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिली असून अद्याप ते घराजवळ असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी माने आणि पोलीस कर्मचारी आकाश सावंत हे दोघे घटनास्थळी गेले. या पोलिसांना रोखण्यासाठी संशयित आरोपी अतुल साळुंखे यांने मोबाइलवरून ओंकार कदम याच्याशी संपर्क साधून पोलिसांना जिवंत सोडायचे नाही, तू पिस्तूल घेऊन ये, गोळ्या घालायच्या आहेत, असे सांगितले. यानंतर एक व्यक्ती तत्काळ त्या ठिकाणी आली. दोघांनीही पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. यात दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी माने यांच्या तक्रारीनंतर साळुंखे, कदम आणि अन्य दोन महिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
आमणापूरमधील मंदिरात चोरी
आमणापूर (ता. पलूस) येथील वैष्णोदेवी मंदिरात मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
आमणापूर येथील येळावी-आमणापूर रोडवर शशिकला जालिंदर मुळीक यांच्या खासगी जागेत वैष्णोदेवी मातेचे मंदिर आहे. मंगळवारी सकाळी शशिकला मुळीक नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेल्या असता, त्यांना गाभाऱ्याचा दरवाजा उघडा दिसला आणि कुलूप गायब झाल्याचे निदर्शनास आले. देवीच्या मूर्तीसमोर ताटातील पैसे तसेच होते, मात्र देवीच्या गळ्यातील दागिन्यांमधील मोतीहार आणि बदाम गायब झाले होते. वैष्णोदेवी मातेचे अनेक मौल्यवान दागिने मंदिरात न ठेवता घरी सुरक्षित ठेवल्याने चोरी होण्यापासून वाचल्याचे श्रीमती मुळीक यांनी सांगितले.