सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत साताऱ्याचा डंका वाजला आहे. परळी येथील प्रणव विनय कुलकर्णी याने देशात २५६वा क्रमांक, कराड येथील अंकिता पाटील हिने ३०३वा क्रमांक, तर मर्ढे (ता. सातारा) येथील संकेत अरविंद शिंगटे याने ४७९ वा क्रमांक, तर बोरखळ (ता. सातारा) कपिल लक्ष्मण नलावडे याने ६६२ वा क्रमांक मिळवून देदीप्यमान यश मिळवले. यूपीएससीमध्ये साताऱ्यातील चौघांनी झेंडा लावल्याने जिल्ह्याच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.

सध्या तरुणाईमध्ये स्पर्धा परीक्षा देण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे लाखो तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बघत आहेत. २०२४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. त्यामध्ये जिल्ह्यातील चार सुपुत्रांनी यश मिळवले आहे.

मूळचा परळीचा व सध्या साताऱ्यात राहणारा प्रणव विनय कुलकर्णी हा सज्जनगडच्या परळी खोऱ्यातील आहे. प्रणवने मागील वर्षीसुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती; मात्र मुलाखत आवेदन प्रक्रियेतून थोडक्यात यशाने हुलकावणी दिली होती. प्रणवचे वडील विनय कुलकर्णी हे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या पोवई नाका, सातारा शाखेमध्ये ऑपरेटर म्हणून नोकरीला आहेत; तर आई गृहिणी आहे.

कराड येथील अंकिता पाटील हिने यूपीएससी परीक्षा सामान्य प्रवर्गातून यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत देशात ३०३ वा क्रमांक पटकाविला. तिने आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबईतील के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून (आयटी) पूर्ण केले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्यात तिला यश मिळाले. तिचे वडील अनिल पाटील हे सध्या मुंबई येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई अर्चना पाटील या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहेत.

मर्ढे (ता. सातारा) येथील संकेत अरविंद शिंगटे याने ४७९ हा क्रमांक मिळवत यशाला गवसणी घातली. संकेत हा मर्ढे येथील माजी सरपंच, प्रगतिशील शेतकरी व किसनवीर साखर कारखान्याचे एचआर व्यवस्थापक अरविंद शिंगटे यांचा मुलगा आहे. आई जयश्री या गृहिणी आहेत. सातारा तालुक्यातील बोरखळ गावातील कपिल लक्ष्मण नलवडे याने देशात ६६२ व्या क्रमांकासह सनदी अधिकारी बनून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. कपिलचे वडील पणन संस्थेत लेखापरीक्षक आहेत.