सावंतवाडी: काजू बोंडावर प्रकिया करून इथेनॉल जैव रंग व जैव रसायने निर्माती करण्यात येणार आहे. त्यासाठी माणगाव येथील हेडगेवार संस्थेच्या वतीने पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आहे.त्यामुळे नजिकच्या काळात काजू बोंडे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देतील अश्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

काजू बोंडे प्रक्रिया उद्योगावर भर दिला जात आहे. तो यशस्वी ठरला तर नजीकच्या काळात काजू बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल. माणगाव येथील हेडगेवार संस्थेच्या वतीने काजू बोंडांवर प्रक्रिया करून इथेनॉल,जैव रंग व जैव रसायन, टॅनीन तयार करण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. सदर पायलेट प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी माजी पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे सहकार्य लाभले असून रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई याचे कुलपती डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे आज काजू बोंडूला ७५ पैसे ते १ रूपया प्रतिकिलो असा मिळणारा दर भविष्यात ५ रूपये प्रति किलो पर्यंत मिळु शकतो असा विश्वास हेडगेवार संस्थेचे अध्यक्ष सुनील उकीडवे यांनी व्यक्त केला आहे.

काजू बोंडावर प्रकिया उद्योग सुरू करण्यासाठी अभ्यास केला. त्यानंतर हा प्रकिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. हेडगेवार संस्थेने यापुर्वी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना काजू बी प्रकिया,फळ प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले.प्रशिक्षणार्थींनी उद्योग सुरू केले. काजू बी गर प्रकिया उद्योगांसाठी ७ ते ८ हजार जणांना प्रशिक्षण दिले. यानंतर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७०० ते ८०० काजूबी गर प्रकिया युनिट सुरू आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मध्ये तर विशेषतः घरोघरी काजू गर प्रक्रिया युनिट कार्यरत आहेत. तसेच फळ प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण ३ हजार लोकांनी घेऊन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ५०० युनिट सुरू केली आहेत.

मात्र काजू बी काढून झाल्यावर बोंड फेकून दिली जात होती. ही बाब लक्षात घेऊन आता काजू बोंडे प्रक्रिया उद्योगावर भर दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या काजू बोंडावर प्रक्रिया होऊन त्यातून आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. त्यासाठी हेडगेवार संस्थेच्या वतीने पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. काजू बोंडे प्रक्रिया करून इथेनॉलची निर्मिती केली जात आहे. हे इथेनॉल पेट्रोल मध्ये मिक्स करण्यासाठी वापरले जाणार आहे. सरकारने इथेनॉल निर्मितीचे धोरण स्वीकारले आहे. त्या आधारे काजू बोंडावर प्रकिया करून इथेनॉल निर्मिती सुरु होणार आहे.

या शिवाय काजू बोंडे प्रक्रिया करून इथेनॉल नंतर जैव रंग ( बिटाकॅरेटीन) व जैव रसायने ( पाॅलीफिनाॅल) आणि टॅनीन बनविले जाणार आहे. हेगडेवार प्रकल्प स्थळी संशोधन करून हा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. जैवरंग व जैव रसायने औषध उद्योगासाठी लागतात. औषध निर्मितीत चांगला भाव मिळतो, त्यामुळे बोंडावर प्रक्रिया प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर बोंडाना चांगला भाव मिळेल. आज गोवा राज्यात बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडील बोंड ७५ पैसे ते एक रुपयाने प्रति किलो घेऊन जातात. हेडगेवार संस्थेने सुरू केलेला पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर बोंडाना किमान प्रति किलो पाच रुपये मिळेल असा विश्वास संस्थाचालकांनी व्यक्त केला आहे.

हेडगेवार संस्थेच्या वतीने केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून सामुदायिक योजना सुविधा केंद्र मंजूर झाले आहे. या सामुदायिक सुविधा केंद्रासाठी २० कोटी ११ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर आहे. हा प्रकल्प एप्रिल मध्यापर्यंत कार्यान्वित होणार असून यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योगाला अत्याधुनिक मशिनरी च्या आधारे प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे तसेच वाया जाणारी नाशिवंत असणारी फळे या प्रकल्पातील कोल्ड स्टोरेज केंद्रात ठेवता येतील. जिल्ह्यात माशांसाठी कोल्ड स्टोरेज आहे. मात्र फळांसाठी नाही . त्यामुळेही हा प्रकल्प बागायतदारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

सामुदायिक सुविधा केंद्र च्या आधारे येथील फळ प्रक्रिया उद्योगातून पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात क्षम उत्पादने तयार व्हावीत असा प्रयत्न असणार आहे, बागायतदारांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

सुनील उकीडवे, अध्यक्ष

आता हेडगेवार संस्थेने १० ते २० किलो बोंडावर प्रक्रिया करून इथेनॉल, जैव रंग व जैव रसायने निर्माती करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प सुरू केला आहे. फक्त इथेनॉल निर्मिती करून फायदा होणार नाही म्हणून जैव रंग व जैव रसायने निर्माती वर भर दिला आहे. आता हा प्रयोग अंतीम टप्प्यात आहे.तो यशस्वी झाला. यश आले तर सहकार तत्वावर आधारित प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायती मोठ्या प्रमाणात आहेत त्या परिसरात हा प्रकल्प उभारला जाईल. त्यावेळी २५ हजार टन बोंडावर प्रकिया करण्याची योजना आहे.