सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात सातत्याने दिसून येत असलेल्या मगरीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अखेर नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागाने या मगरीला पकडण्यासाठी सापळा लावला आहे. हा सापळा आता मगरीला पकडण्यात यशस्वी ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​गेल्या काही दिवसांपासून मोती तलावात वारंवार मगरीचे दर्शन होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार, शुक्रवारी वनविभागाच्या जलद कृती दलाने बोटीच्या सहाय्याने संपूर्ण तलावाची पाहणी केली, मात्र त्यांना मगर आढळून आली नाही.

​त्यानंतर, शनिवारी याच जलद कृती दलाने मोती तलावातील संगीत कारंजाजवळ मगरीला पकडण्यासाठी खास सापळा बसवला आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे वनविभागाने ही खबरदारी घेतल्याचे वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख रामचंद्र रेडकर यांनी सांगितले. गणेशोत्सवादरम्यान शहरातले बहुतांश गणपती याच ठिकाणी विसर्जित केले जातात आणि त्यावेळी अनेक लोक पाण्यात उतरतात. अशा वेळी मगरीमुळे कोणालाही धोका होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

​रेडकर यांनी सांगितले की, शुक्रवारी त्यांना मगर दिसल्याचा फोन आला होता. त्यानंतर त्यांनी तात्काळ पाहणी केली, परंतु मगर दिसली नाही. आता या सापळ्याच्या मदतीने मगरीला पकडून तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून, मगर लवकरच पकडली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.