सोलापूर : मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनांचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्या झालेल्या कथित भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबाबत त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तत्काळ खुलासा करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी आंबेडकर सोलापुरात आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार आणि दाऊद यांच्या कथित भेटीचा संदर्भ देऊन सनसनाटी आरोप केला. ते म्हणाले, की १९९० ते २००० या कालावधीत मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या मालिका घडल्या होत्या. त्याच सुमारास तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्या कथित भेटीचा संदर्भ लागतो. त्या काळातील बॉम्बस्फोटांचा आणि शरद पवार व दाऊद इब्राहिम यांच्या कथित भेटीचा काही संबंध आहे काय, याची चौकशी झाली पाहिजे. कारण आताही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंता करावी, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल, तर ही चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या या आरोपाचा खुलासा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तत्काळ करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

हेही वाचा : Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना आंबेडकर म्हणाले, की देशाच्या संरक्षणाचा विषय तुमच्या विषयपत्रिकेत कधीच नाही. जात आणि धर्माच्या बाहेर जायचे नाही. केंद्रीय गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी बोरा समितीच्या अहवालातील जोडपत्र संसदेत का आणले नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशीही मागणी आंबेडकर यांनी केली. महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या पाण्याचा प्रश्न सतावतो आहे. शेतकऱ्यांना, विशेषतः महिलांना डोक्यावर घागर घेऊन मैलोन मैल दूर भटकत पाणी आणावे लागते. पाण्याचा प्रश्न सोडवला, तर महाराष्ट्राचे आर्थिक जीवनमान सुधारले असते आणि लाडकी बहीणसारखी योजना आणण्याची गरजच उरली नसती, असे मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले. राजकारणात वावरत सर्व राजकीय पक्षांचे शत्रुत्वाचे नव्हे, तर मित्रत्वाचे संबंध असायला हवे. यातून राजकारणाचा दर्जा टिकून राहतो. आपण नुकतेच आजारी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली, याचा दाखला त्यांनी दिला. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर उपस्थित होत्या.