सावंतवाडी : ​वेंगुर्ले तालुक्यातील रेडी सुगळभाट येथे खाजगी मालमत्तेत सीआरझेड-१ (CRZ-1) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. श्री. भूषण बांदिवडेकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत, १६ ऑक्टोबर रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी, डीजीएम (DGM) कोल्हापूर यांचे प्रतिनिधी, तलाठी आणि पंच यांच्या पथकाने या जागेची पाहणी केली आणि उत्खननाचे मोजमाप घेतले, अशी त्यांनी माहिती दिली.

​या पाहणी दरम्यान, सौ. भक्ती बांदिवडेकर व इतर पाच जणांच्या खासगी मालमत्तेमध्ये सीआरझेड-१ मध्ये येत असलेल्या क्षेत्रात अनधिकृत उत्खनन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. पथकाने या अवैध उत्खननाचे मोजमाप घेऊन कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.

यासोबतच, पाहणी पथकाला इतर साठे क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याचे स्थळ पाहणी दरम्यान आढळून आले आहे. याप्रकरणी लवकरच दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

“हा एक मोठा घोटाळा”: भूषण बांदिवडेकर यांचा शासनाला थेट आव्हान

तक्रारदार श्री. भूषण बांदिवडेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाला एक “मोठा scam” (घोटाळा) असल्याचे जाहीरपणे म्हटले असून, त्यांनी शासनाला थेट आव्हान दिले आहे. बांदिवडेकर यांनी १६ सप्टेंबर २००६ रोजी Cease (बंदी) असलेल्या लोह खनिज साठे फक्त १९,३०० मेट्रिक टन असताना, मिनरल्स कंपनीला २ लाख २५ हजार मेट्रिक टनची परमिशन (परवानगी) कशी मिळाली, असा थेट सवाल उपस्थित केला आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित राहिलेले आहे.

या गंभीर प्रकरणाची दाद आपण मुंबई उच्च न्यायालयात मागणार असल्याचे श्री. भूषण बांदिवडेकर यांनी स्पष्ट केले आहे. अवैध उत्खनन आणि परवानग्यांमधील विसंगतीमुळे हा विषय आता न्यायालयीन लढाईत जाण्याची चिन्हे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.