Final Phase of Samruddhi Mahamarg : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज (गुरुवार, ५ जून) रोजी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेटमधील इतर मंत्री व अधिकारी उपस्थित होते. या मार्गावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी टेस्ट ड्रायव्हिंगही केली. यावेळचा किस्साही अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितला.
अजित पवार म्हणाले, “समृद्धी मार्गावरून जाताना ऑडी गाडीचं सारथ्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते. मागे मी बसलो होतो, गाडी व्यवस्थित चालली आहे की नाही हे पाहत होतो. माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या. जाताना गाडी व्यवस्थित गेली. ही सुरुवात होती, त्यामुळे धोका न पत्करता एकनाथ शिंदेंनी सारथ्य केलं.”
“येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केलं. म्हटलं हे बाबा गाडीवर बसल्यावर ही गाडी चालणार नाही. आपण एलसी घेऊया. एलसी निरंजन डावखरे यांची होतीच. त्याला सांगितलं की गाडी दे. त्याने लगेच गाडी दिली. देवेंद्र फडणवीसांनी गाडी चालवायला घेताच गाडीने १०० चा स्पीड घेतला. मग १२० च्या स्पीडने गाडी जाऊ लागली. टनेल येईलपर्यंत गाडीचा स्पीड १२० होता. टनेल सुरू झाल्यावर १०० स्पीडवर गाडी आली, कारण टनेलमध्ये १०० स्पीडचा नियम होता. असं नियमांचं पालन करत अतिशय सुरक्षित येथे पोहोचलो”, असं अजित पवार म्हणाले. इगतपुरी ते आमणे या मार्गावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी टेस्ट ड्राईव्ह केल्यानंतर नाशिकच्या इगतपुरी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने संपूर्ण ७०१ किमी लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता नागपूर – मुंबई प्रवास १६ तासांऐवजी आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पणही पार पडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गिकेचं लोकार्पण केलं. या मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक सुकर होणार आहे.