कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील संततधार तर धरणाखालील कृष्णा, कोयना काठावरील पावसाची रिपरिप कायम आहे. पावसाचा जोर आज चांगलाच वाढल्याने पाटणनजीकच्या संगमनगर धक्का पुलासह कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्प शिगोशीग भरले असून, प्रमुख १२ धरणांमध्ये ८४.९७ टक्के पाणीसाठा आहे. वारणा, राधानगरी, कण्हेर तसेच, सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील वीर धरणातून एकंदर ३०,२९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पात असलेला पाणीसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्याची टक्केवारी- कोयना जलसागर ७९ (७५), वारणा ३१.४० (९१), दूधगंगा १९.५७ (७७), राधानगरी ८.३५ (१००), धोम ९.८० (७२.७), कण्हेर ९.२१ (९१.२०), उरमोडी ८.३५ (८६.५८), तारळी ४.८८ (८३.६७), धोम बलकवडी ३.६७ (८९.७२) तर, सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील पुणे जिल्ह्यातील वीर ९.४१ (१००), नीरा देवघर ९.४४ (८०.५२), भाटघर १७ (७२.३६).  
आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत गेल्या १० तासांत कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ५३ एकूण ३,४०१, नवजा विभागात १०६ एकूण ४,१८२ तर, महाबळेश्वर विभागात १०५ एकूण ३,२१४ मि.मी. पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस ३,५९९ मि.मी. नोंदला गेला आहे. कोयना जलसागरात सध्या मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. धरणाची जलपातळी २,१३९.५ फुटांवर असून, पाणीसाठा ७९ टीएमसी म्हणजेच ७५.०५ टक्के आहे. कोयना जलाशयात पावसाळी हंगामाच्या ६४ दिवसांत ६८ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. दरम्यान, पावसाने आजअखेरची सरासरी पार केल्याने शेतकऱ्यासह सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील पवना ८१.९६ टक्के, टेमघर ७३.९२, वरसगाव ६५.८८, पाणशेत ६९.२५ तर खडकवासला प्रकल्पात ९७.६० टक्के पाणीसाठा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onकराडKarad
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase rain dam full
First published on: 05-08-2014 at 02:35 IST