श्रीनगर येथे गुरुवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले मराठा रेजिमेंट बटालियनचे जवान यश देशमुख (२१) यांच्यावर चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे शनिवारी सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्ह्य़ातील नागरिक मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते.

यश देशमुख यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री नाशिक येथे विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव या त्यांच्या गावी आणण्यात आले. सुरुवातीला यश यांच्या घरी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर जवानांनी पार्थिव तिरंग्यात लपेटून सजविलेल्या वाहनावर ठेवले. वाहनावरून अंत्ययात्रा अंत्यविधीच्या स्थळापर्यंत नेण्यात आली. सर्व उपस्थितांकडून शहीद यश देशमुख अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा देण्यात येत होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

बंदुकीच्या चार फैरी हवेत झाडून यश यांना सैन्य दल आणि जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यश यांचा भाऊ पंकजने अग्नीडाग दिल्यानंतर उपस्थित गहिवरले. या वेळी मंत्री दादा भुसे यांनी शहीद वीर जवान देशमुख यांच्या परिवाराला महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी रुपयापर्यंत मदत देण्याची घोषणा केली.