प्रदीप नणंदकर

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकाच वेळी ९१ (हार्वेस्टर) ऊसतोडणी यंत्र व त्यासाठी लागणारी १८० वाहने मंजूर केली असून संबंधितांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यांत्रिक शेती ही वेगाने वाढते आहे, त्यामुळे ऊसतोडणीच्या बाबतीतही यंत्राचा अधिक वापर करणे ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन लातूर जिल्हा बँकेने ऊसतोडणी यंत्र पुरवठय़ासाठी लागणारी वाहने मंजूर केली. संपूर्ण देशभरात एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर ऊसतोडणी यंत्रासाठी कर्ज उपलब्ध करून देणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एकमेव आहे. दिलीपराव देशमुख म्हणाले, उसाचे क्षेत्र दरवर्षी वाढते आहे व ऊसतोडणी मजुरावर सर्वाना अवलंबून राहावे लागते आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेसाठी सतत जिल्हा बँकेचा प्रयत्न असतो. पाच लाख रुपयांचे शून्य टक्के व्याजदराने कर्जही बँकेने उपलब्ध करून दिले. आगामी काळात साखर कारखाने हे केवळ सहा महिने चालतात. मांजरा परिवार ते उत्तमपणे चालवते व चांगला भावही देते. उर्वरित सहा महिने कारखाने बंद असताना शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी त्याचा वापर करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी आहे व त्या दृष्टीने बँकेने नियोजन केल्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येत असल्याचे सांगितले. आमदार बाबासाहेब पाटील यांनी एके काळी अवसायनात निघालेली बँक होती. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसेदेखील बँक देऊ शकत नव्हती. त्या स्थितीतून लोकनेते विलासराव देशमुख व दिलीपराव देशमुख यांनी दूरदृष्टी ठेवून जिल्हा बँक ही देशात अव्वल क्रमांकाची म्हणून गणली जाते इतका पल्ला गाठला.

 विरोधासाठी विरोध किती दिवस?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलीपराव देशमुख यांनी विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत, असे किती दिवस करणार? मांजरा परिवाराने आत्तापर्यंत उसाला अतिशय दर्जेदार भाव दिला आहे. आता विरोधकही साखर कारखानदारीत उतरले आहेत. त्यांनी मांजरा परिवाराप्रमाणे भाव देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना अप्रत्यक्षपणे देशमुख यांनी आव्हान दिले आहे. निलंगेकर यांनी बंद पडलेला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुरू केला आहे.