सांगली : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सांगली, विश्व योग दर्शन सांगली आणि चितळे डेअरी भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २१) रोजी भक्ति योग हा योग सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची नोंद जागतिक विक्रम म्हणून करण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे मुख्य केंद्र छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम सांगली हे असून हा कार्यक्रम २१ जून रोजी सकाळी ८ ते ८.४५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय संस्था, अशासकीय संस्था, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, शाळा-महाविद्यालये, ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक यांच्या सहभागातून व सुसंवादातून एकाच वेळी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जोपासत, वारकरी व पारंपरिक पध्दतीने भक्तिमय वातावरणात अनोख्या पध्दतीने योग सादरीकरण करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमात सर्वसमावेशकता आणण्यासाठी भक्ति योग या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केले आहे.