सांगली : पोलीस असल्याची बतावणी करून वाटसरूंना लुबाडणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक करून त्याच्याकडून सहा लाखांचे लुटलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून जाणारे वाहनचालकांना अडवून, हातचलाखी करून आरोपी दागिने लंपास करत होते. काशिम सलिम इराणी (वय २७, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, पुणे. सध्या रा. जयसिंगपूर) याला अटक करण्यात आली आहे.
आटपाडी येथे गेल्या आठवड्यात दुचाकीवरून निघालेल्या शेतकरीला अडवून पोलीस असल्याची बतावणी करत पुढे लुटालूट चालू आहे. दागिने खिशात ठेवा, असे सांगितले. दागिने रुमालात बांधून देताना हातचलाखी करून दागिने लंपास केले होते. तसेच जतमध्येही असाच प्रकार करून एका वृद्ध व्यक्तीचे दागिने लंपास करण्यात आले होते.
अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाने साथीदार अबुजर इराणी याच्या मदतीने आटपाडी व जत येथे सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी पुणे, कोल्हापूरसह पश्चिम बंगालमध्येही गुन्हे दाखल आहेत. या सराईत गुन्हेगाराकडून सहा लाख १५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.