लोकसत्ता प्रतिनिधी
रत्नागिरी : मानसिक तणावाच्या गोळ्या शीतपेयात मिसळून नशा करणाऱ्या टोळ्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रत्नागिरीतील २४ तास सुरु असणाऱ्या मेडिकल दुकानांवर रात्री ११ नंतर शीतपेय विक्री करण्यास बंदी घातली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी मोहीम पोलिसांकडून तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमे दरम्यान मानसिक तणावाच्या गोळ्या शीतपेयात मिसळून नशा करणाऱ्या टोळ्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २४ तास सेवा देणा-या मेडिकल दुकानांकडे मोर्चा वळविला आहे. पोलिसांनी सर्व २४ तास सेवा देणा-या मेडिकल दुकानांना नोटीसा बजावून रात्री ११ नंतर शीतपेय आणि आयस्क्रीमसारख्या वस्तूंची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याने मेडिकल दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरी पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. रत्नागिरी पोलिसांनी या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली असून मेडिकल दुकानदारांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.