शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून ठाकरे व शिंदे गटात सुरु असलेल्या वादाच्या निकालासंदर्भात केलेल्या विधानावर टीका केली आहे. “निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांच्या खिशात आहे काय?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे निकाल जाहीर केला सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्याच बाजूने लागेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांना ब्रेकींग न्यूज देत सांगतात.शिवसेनेचे चिन्ह जाईल ते शिंदे यांनाच मिळेल. No comments!” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

नाशिक येथे नुकतीच भारतीय जनता पार्टीची प्रदेश पदाधिकारी बैठक पार पडली. या कार्यक्रमातून भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झालं आहे, ते सरकार खुद्दारांचं आहे. २०१९ मध्ये स्थापन झालेलं सरकार गद्दारांचं होतं, अशा शब्दांत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –

उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, “आज राज्यात जे सरकार स्थापन झालं आहे. ते गद्दारांचं सरकार नाही, हे खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांची खुद्दारी जनतेसाठी, विचारांसाठी आणि हिंदुत्वासाठी आहे, अशा खुद्दारांचं हे सरकार आहे. पण ते (महाविकास आघाडी) रोज सकाळी उठून हे सरकार बेकायदेशीर आहे, असं म्हणतात. कारण त्यांना भीती आहे की, उरले-सुरलेले १०-१५ आमदारही निघून जातील. म्हणून त्यांना दररोज सांगितलं जातं की, हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार अपात्र ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण जिंकणार आहोत. हा संदेश आपल्यासाठी नाही. जे उरले-सुरले आहेत, त्यांच्यासाठी हा संदेश आहे.”

नारायण राणे काय म्हणाले? –

“ही ब्रेकिंग न्यूज टाका” असं म्हणत राणेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कुणाच्या बाजुने लागणार याबाबत भविष्यवाणी केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होऊ घातलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत विचारलं असता, नारायण राणे म्हणाले, “मी ज्योतिष सांगू का? कारण न्यायालयातील प्रकरणांवर मी कधी बोलत नाही. पण उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडत आहेत. ते चिन्ह जाईल. ते चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल. ही टाका ब्रेकिंग न्यूज…” सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच नारायण राणेंनी सूचक विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.