धवल कुलकर्णी

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं हे सक्तीचं झालं आहे. मात्र मास्क मिळवण्यासाठी लोकांना आजही कसरत करावी लागते आहे. शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी मास्क उपलब्ध नसतात. असलेच तर त्यांच्या किंमतीही भरपूर असतात. मात्र जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी वीस रुपयांच्या नाममात्र किंमतीत कापडाच्या मास्कचे उत्पादन करुन ते विकण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या ” २६ मार्चपासून बचतगटांमधील महिलांनी साधारण ५० हजारांच्या आसपास मास्क शिवले आहेत. जळगाव जिल्हा, नाशिक शहर आणि निफाड या ठिकाणी ते विकले आहेत” अशीही माहिती त्यांनी दिली. सध्या इतर वाहनांची वाहतूक बंद असल्याने भाजीच्या टेम्पो किंवा ट्रकमधून या मास्कची वाहतूक केली जाते.

या मास्कची मागणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून किंवा दवाखान्यातून केली जाते. बचत गटाच्या २३ महिला या जळगावमधील रावेर तालुक्यातल्या आहेत. या महिलांकडे सध्या साधारणपणे १८ हजार मास्कची ऑर्डर आहे.

एका मास्कची किंमत ही २० रुपये आहे. समजा मास्क शिवण्यासाठी आपले कापड आणि रीळ दिले तर शिलाईचे चार रुपये घेऊन हे मास्क शिवून दिले जात आहेत. दोन दिवसांमध्ये हे मास्क तयार होतात. समजा मोठी ऑर्डर आली तर या मास्कची किंमत २० वरुन १५ रुपयेही करण्यात येईल असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.