जालना : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमांना राजकीय स्वरूप आले. ‘महायुती’मधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे तीन स्नेहमेळावे जालना शहरात पार पडले. दिवाळी मिलन असल्याने हे मेळावे कार्यक्रम वैयक्तिक पातळीवरील असले, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला राजकीय स्वरूप मात्र येऊन गेले.
शिवसेनेचे स्थानिक आमदार अर्जुन खोतकर आणि युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमास जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी उभे राहू इच्छिणाऱ्या आणि नव्याने पक्ष प्रवेश केलेल्यांची गर्दी झाली होती. अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर आमदार खोतकर यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांनी संघटितपणे लढून स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण आणि धैर्यशील चव्हाण यांनी आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात भाषणे झाली नाहीत; परंतु स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवारांची मात्र गर्दी झाली होती. अनेक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक चर्चा झाल्यानंतर अरविंद चव्हाण यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले, की जिल्ह्यात आणि जालना शहरात पक्षाची चांगली तयारी आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेला (शिंदे) सोबत घेऊन भाजपने ही निवडणूक ‘महायुती’ म्हणून सर्वांना सन्मान देऊन लढवावी, अशी आमची अपेक्षा आहे. अन्यथा निवडणूक स्वबळावर लढवावी, असे मत आमच्या जिल्हा पातळीवरील बैठकीत व्यक्त करण्यात आलेले आहे.
भाजपचे जालना शहराध्यक्ष भास्कर दानवे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमास माजी केन्द्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राजेश राऊत, अशोक पांगारकर यांच्यासह ‘महायुती’ मधील अनेक स्थानिक पुढारी उपस्थित होते. या वेळी खोतकर यांनी आपण भास्कर दानवे यांच्या पाठीशी असल्याचे सांगून महापौरपद अडीच वर्षे वाटून घेऊ, अशी सूचना केली. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ‘महायुती’ म्हणून लढविण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांना बैठकीचे निमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले.
रावसाहेब दानवे यांनी निवडणुकी्च्या पार्श्वभूमीवर लवकर बैठक घेण्याची सूचना ‘महायुती’मधील घटक पक्षाच्या नेत्यांना केली. आपल्याला सांभाळून बोलावे लागते अन्यथा एखादा शब्द जरी चुकीचा निघाला, तरी चार-पाच दिवस तेच वृत्तवाहिन्यांवर दाखविले जाते, असेही ते म्हणाले.
