परभणी: सातत्याने झालेली अतिवृष्टी आणि गोदावरीला आलेला पूर यामुळे जांभूळबेटाची झीज होत चालली असून चहूबाजूंनी संरक्षक भिंतीची भक्कम तटबंदी नसल्याने गोदावरीचा प्रवाह दुभंगून मध्यभागी निर्माण झालेले निसर्गसुंदर जांभुळबेट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परभणी जिल्ह्यातील एक सुंदर असे पर्यटन स्थळ नामशेष होण्याच्या पंथाला लागले असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध नैसर्गिकरित्या निर्माण झालेले जांभूळबेट हे जिल्ह्यातील पर्यटनाचा आकर्षणबिंदू  असून चहूबाजूंनी अथांग जलाशय आणि गर्द झाडीत निरव शांतता जपणारे जांभुळबेट गेल्या काही वर्षात पर्यटकांना नव्याने साद घालत आहे. तथापि गेल्या दोन-तीन महिन्यापासून सातत्याने अतिवृष्टी, व पुराचा सामना करताना जांभूळ बेटाचे हे निसर्ग सौंदर्य नष्ट होत चालले आहे. चहुबाजूनी संरक्षक भिंत नसल्याने दररोजच जांभूळबेटाची झीज होत असून या बेटाचा उंच भूभाग जर असाच नष्ट होत गेला तर संपूर्ण बेटच पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या हे बेट संरक्षक भिंतीअभावी सर्व बाजूंनी ढासळत चालले आहे.

शहरातला सर्व गोंगाट विसरून निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर परभणी जिल्ह्यात जांभूळबेट हे उत्तम ठिकाण आहे. गोदावरीच्या पात्रातून बोटीने प्रवास करून जांभूळ बेटावर जावे लागते. पूर्वी हे बेट म्हणजे तब्बल २७ एकराचा भूभाग होता आता मात्र चहूबाजूंनी पाण्यामुळे होणारी झीज लक्षात घेता ते आता १५ एकरावर आले आहे. या ठिकाणी पशु पक्ष्यांचे आवाज, विशेषतः मोरांचे केकावणे सतत कानी पडते. सकाळी आणि सायंकाळी मोरांचे विलोभनीय दर्शन घडते.

 जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध वारसा असलेले हे ठिकाण आहे. घनदाट झाडी आणि चहूबाजूंनी पसरलेले पाणी या पार्श्वभूमीवर इथला सूर्योदय आणि सूर्यास्त अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. या बेटावर पोहोचताच जांभळाची खूप जुनी झाडे पहावयास मिळतात, त्यामुळेच त्याला जांभुळबेट हे नाव पडले आहे. या बेटावर निसर्गाच्या अद्भुत आविष्काराचा अनुभव येतो. बेटाच्या सर्व बाजूने पाणी असल्याने या ठिकाणचे तापमान कडकडीत उन्हाळ्यातही सुसह्य असते. चहूबाजूनी असलेला विस्तीर्ण जलाशय हा पशुपक्ष्यांनाही मोहवणारा आहे.

या नितांत रमणीय अशा ठिकाणाची आजवर उपेक्षाच झाली मात्र गेल्या काही वर्षात निसर्गप्रेमींच्या पुढाकारातून जांभुळबेट संवर्धन समिती अस्तित्वात आली. या कामी कृषिभूषण कांतराव देशमुख, झरीकर यांनी पुढाकार घेऊन स्थानिक तरुणांनाही सोबत घेतले व जांभूळबेटाला पुन्हा जुने वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला.  गेल्या पाच, सहा वर्षापासून जांभुळबेट संवर्धन मोहिमेच्या कामाला सुरुवात झाली. या बेटावर जाण्यासाठी नियमित बोट लागणार होती, त्यामुळे जांभूळबेट संवर्धन समितीने लोकसहभागातून एक बोट आणि दहा लाईफ जॅकेट्स खरेदी करून त्याचे लोकार्पण केले. आता पूरस्थितीने मात्र जांभूळबेटाच्या निसर्गसौंदर्याला ग्रहण लागले आहे.

अन्यथा निसर्गाचा ठेवा नष्ट होईल

नुकत्याच झालेल्या पूरस्थितीमुळे जांभूळबेटाची झिज होत चालली आहे. जिल्हाधिकारीपदी श्रीमती आंचल गोयल असताना त्यांनी जांभुळबेटाला संरक्षक भिंत करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली होती. सध्याच्या पूर परिस्थितीमुळे जांभूळबेटाला मोठा फटका बसला असून दररोजच या बेटाची झीज होऊ लागली आहे. जांभूळबेट हे ठिकाण परभणीसह हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना जवळचे आहे. पण आज घडीला जांभूळबेट नामशेष होणार नाही याची लोकप्रतिनिधी व प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. अन्यथा जर अनास्था दाखवली तर हे बेट नामशेष होईल. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा निसर्ग ठेवा नष्ट होईल.- कृषीभूषण कांतराव देशमुख, झरीकर जांभूळबेट संवर्धन समिती