सांगली : राज्यात गेल्या चार वर्षात मूळची विचारधारा सोडून राजकारण होत असल्याचे दिसत आहे. मात्र, जनसुराज्य शक्ती पक्षाने आपली विचारधारा सोडून कधीही राजकारण केलेले नाही. यामुळेच या पक्षावर आजही सामान्य जणांचा विश्वास कायम असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केले.

मिरजेत पक्ष कार्यकर्त्यांचा राज्यस्तरिय मेळावा पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना आमदार कोरे बोलत होते. प्रदेशाध्यक्ष समित कदत यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास आमदार अशोक माने, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजय माने, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विशांत महापुरे, अमित कदम प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मिरजेचे माजी नगराध्यक्ष डॉ. महादेव कुरणे यांनी प्रास्ताविक, तर शहराध्यक्ष डॉ. पंकज म्हेत्रे यांनी स्वागत केले.

यावेळी बोलताना आमदार कोरे म्हणाले, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्ष महायुती सोबतच आहे. जनसुराज्य पक्ष हा गुलालाचा पक्ष आहे. पक्षांने यापुर्वी जिल्हा परिषदेत सभापती व उपाध्यक्षपदही कार्यकर्त्यांना दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून महायुतीकडे जागांची मागणी केली जाईल.

राज्यात गेल्या चार वर्षांमध्ये विचारधारा सोडून राजकारण झाल्याचे दिसून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी विचारधारा सोडून राज्य केले. मात्र जनसुराज्य पक्षात हे दिसून आले नाही. पक्षाने स्थापनेपासूनच्या २० वर्षात राजकीय विश्वासाचा प्रवास केला आहे. या पक्षाने राजकारणात काहीतरी वेगळं पण दिले आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष कदम म्हणाले, की जनसुराज्य पक्ष युवकांपुढे एक आदर्श पक्ष म्हणून नावारुपास येत आहे. पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. विकास कामासाठी निधीची मागणी पक्षाकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकासाचा प्रश्नाला प्राधान्य आहे. त्यांनी कायम विकासात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. सहकार्य केले आहे. आगामी महापालिकेत जनसुराज्य शक्तीच्या सदस्यांची संख्या दहापासून पुढे असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रदीप पाटील, अमर पाटील, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, बाजार समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शेजाळ, भारत कुंडले आदींसह पूर्व भागातील टाकळी, एरंडोली, आरग, शिपूर, बेडग आदी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.