ऊसदरासाठी आंदोलन छेडणा-या राजू शेट्टी यांना ‘ऊस फुकट न्या’ म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल करीत २२०० रुपयांत तडजोड करणा-या हंगामी खासदारांनी ऊसदराबाबत चर्चेची तयारी न ठेवता पळ काढला. ऐन वेळी आंदोलनातून पळ काढून राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतक-यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केला. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ४४व्या गळीत हंगाम समारंभात ते बोलत होते.
ते म्हणाले, आंदोलन काळात महिनाभर कारखाना बंद राहिल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले. शेट्टींचा खटाटोप प्रसिद्धी, राजकारण व लोकसभा निवडणुकीसाठी आहे. सर्वापेक्षा चांगला दर देण्याची आमची आजवरची क्षमता आहे. तो किती द्यायचा हे शेट्टींनी आमच्याकडे येऊन सांगण्याची गरज नाही. त्यांना यातील काही कळत नाही. आंदोलनामुळे दर मिळाल्याचे श्रेय घेणे शेट्टींनी बंद करावे. मंडलिकांकडे जाऊन त्यांनी २२०० रुपयांवर तडजोड केली तेव्हाच शेतक-यांचा विश्वास त्यांनी गमावला आहे. त्यांनी शेतक-यांसह आपले सहकारी सदाभाऊ खोत यांचाही विश्वासघात केला. एखादे नेतृत्व इतक्या पातळीवर खाली उतरू शकते हे आंदोलनाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण असावे.
ते म्हणाले, ‘टनाला तीन हजार रुपये दर त्यांनी मिळवून दाखवावा. मीच त्यांचा बिल्ला माझ्या खिशाला लावून फिरतो. शेट्टींनी आमच्या कारखान्याने तीन हजार रुपये दर दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादीत विलीन करतो, असे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादीत आधीच एवढी गर्दी आहे त्यामुळे दंगलखोरांना, नुकसान करणा-यांना आमच्या पक्षात जागाही नाही. कुठेही गेले तरी त्यांचा जयंत पाटील हाच विरोधक आहे. संघर्ष उसाच्या दरावर होता तर माझ्यावर का आरोप करता? सभेत लोकसभा निवडणुकीचा विषय का काढता? सरकारच्या बठकीत शेट्टी आमचा ऊस फुकट घ्या म्हणाले. हा शेतक-यांचा अपमान आहे. एवढा अधिकार यांना कुणी दिला, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
आपणाला मतदारसंघात पर्मनंट खासदार हवा आहे. ऊसदराशी खासदारकीचा संबंध नाही. पण त्यांच्याकडे दुसरा विषयच नसल्याने ते दुसऱ्या कशावर बोलतच नाहीत. लोकांनी देखील कोणाच्या नादाला लागायचे हे ठरवायला हवे. लोकसभेला मते देऊन ज्यांना निवडून दिले त्यांनी केंद्र शासनात तोंड उघडून धोरणे बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पंतप्रधानांच्या समोर गेल्यानंतर धोरणात्मक बोलणे अपेक्षित असते, पण शेट्टींना त्यातले काही समजले नाही. तेथे गेल्यावर ‘तुम्ही आम्हाला दर किती देणार’असेच ते विचारत होते असेही पाटील या वेळी म्हणाले.
कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचा निषेध केला. बंडा नांगरे, अनिल सांडगे, शिवाजीराव देसावळे, जयदीप पाटील, सुनील पाटील, कल्लाप्पा पोचे, विनोद बाबर, संग्रामसिंह फडतरे, जे. डी. मोरे, रावसाहेब ऐतवडे यांची भाषणे झाली. रामराव देशमुख, विष्णुपंत शिंदे, प्रा. श्यामराव पाटील, नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, शहाजी पाटील, अ‍ॅड. बी. एस. पाटील, बाळासाहेब पाटील, प्रतोद विजयभाऊ पाटील, जनार्दन पाटील, विजय मोरे, भीमराव माने, खंडेराव जाधव, डॉ. प्रतापराव पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले.