२००४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव करणारा अभिनेता गोविंदा आज (२८ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा हा राजकारणात पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदाला शिवसेनेकडून मुंबईतल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात आहे. परंतु, एकनाथ शिंदे आणि गोविंदाने या खोट्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

गोविंदाच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज शिवजयंतीच्या अत्यंत पवित्र दिनी आपले सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते गोविंदा हे शिवसेनेत आले आहेत. मी आपल्या पक्षात त्यांचं मनापासून स्वागत करतो. डाऊन टू अर्थ असणारे आणि सर्वांना आवडणारे गोविंदा शिवसेनेत आले आहेत. सगळ्याच समाजात लोकप्रिय असलेले गोविंदा यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छाही देतो. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यानंतर गोविंदा म्हणाला, मी आज या पक्षात आलो आहे. १४ वर्षांचा वनवास संपला आहे आणि रामराज्यात आलो आहे असं मला वाटतं आहे. जी जबाबदारी मला दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन असं गोविंदाने म्हटलं आहे.

हे ही वाचा >> भाजपाच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव केलेला गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत

दरम्यान, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून शिवसेनेवर आणि गोविंदावरही टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, गोविंदा यांचे चित्रपट आता चालत नाहीत. त्यांचा शेवटचा चित्रपट आपटल्यानंतर त्यांना काहीतरी हवं होतं. तसेच शिंदे गटाने एखादा चालणारा तरी नट घ्यायला हवा होता.