राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राती राजकीय नेते आणि राजकीय कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करत कानपिचक्या दिल्यात. मागील काही वर्षांपासून राज्यात राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्याकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे, बदलीची धमकी देण्याचे प्रकार वाढले असल्याचं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच नेते आणि कार्यकर्त्यांनी केवळ केसेस आणि बदली कामा पुरतेच पोलीस ठाण्यात येऊ नका. पोलिसांना पाठबळ देण्यासाठी पण या, असा सल्ला देत राजकीय नेत्यांचे कान टोचले. सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील हे बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे. ‘हे करा, ते करा, बघतोच तुम्हाला, इकडं घालवतो, तिकडे घालवतो’ असं बोललं जातं. त्यांना नोकरीच करायची असते, पण ही लोकं काम करत असतात. मागेच पोलिसांनी चोरांचा पाठलाग करून सोनं, दागिणे हस्तगत केलेले नागरिकांना माझ्याच हस्ते परत दिलेत. ही खरी सेवा असते. ज्याचं सोनं चोरी जातं त्याचं सर्वस्व जातं, त्यामुळे हे सोनं परत मिळाल्यावर हे नागरिक पोलिसांना खूप आशीर्वाद देत असतील, याची मला खात्री आहे.”

“गोंधळ करणाऱ्यांची चौकशी लांबच राहते, हवेत गोळीबार करणाऱ्या पोलिसांची चौकशी होते”

“खरंतर पोलीस दलाला अधिक अधिकार दिले पाहिजे असं माझं मत आहे. हे मत आज नाही, तर मी गृहमंत्री होण्याच्या आधीपासून आहे. ते यासाठी की एक पोलीस उभा राहिला तर त्याच्या दोन्ही बाजूला १ किलोमीटर कुणाचा आवाज काढण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. पोलिसांचे अधिकार वाढवले तर त्यांचं नैतिक वजन वाढतं. आपल्याकडे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तरी पोलिसांचीच चौकशी होते. गोंधळ करणाऱ्यांची चौकशी लांबच राहते, हवेत गोळीबार करणाऱ्या पोलिसांची चौकशी करणारे आम्ही लोक आहोत,” असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

हेही वाचा : गृहमंत्रीपद का नाकारलं? जयंत पाटलांकडून आर. आर. पाटलांच्या ‘त्या’ सल्ल्याचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपण पोलिसांना जितकं संरक्षण देऊ तेवढं पोलीस धाडसानं काम करतात. अनेकदा राज्यकर्त्यांचे समजगैरसमज होतात. मग राज्यकर्त्यांचा पहिला प्राधान्यक्रम पोलीस अधिकाऱ्याला बदलण्याला देतात. बदली करणं हा उपाय नसतो. खरंच त्याची चूक असेल तर सुधारणेसाठी त्याला संधी दिली पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.