राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमान रॅली आणि शेवटी सभा आज बीडमध्ये पार पडली. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार आणि पक्षाचे इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी सर्वच वक्त्यांनी बोलताना सत्ताधारी शिंदे गट, भाजपा व अजित पवार गट यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, शरद पवारांची साथ सोडणाऱ्या अजित पवारांनाही या वक्त्यांनी लक्ष्य करताना पुढील वर्षी निवडणुकांमध्ये सत्ताधारी युतीला पराभूत करण्याचा निर्धार बोलून दाखवला. यावेळी देशातील परिस्थितीवर जयंत पाटील यांनी शायरीच्या माध्यमातून टिप्पणी केली. यानंतर त्यांनी केलेल्या विधानावर उपस्थितांबरोबरच खुद्द शरद पवारांनीही दिलखुलास दाद दिली.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना सत्ताधाऱ्यांकडून जातीय, धार्मिक भावना भडकवण्याचं काम केलं जात असल्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला. “जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात बजरंग दलाची मुलं मोर्चे काढून गेले. ढोल-ताशे घेऊन चार मशिदींच्या समोर ते वाजवण्याचं काम झालं. पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नव्हती. पण कोणत्याही परिस्थितीत जातीय तणाव निर्माण झाला पाहिजे ही भूमिका डबल इंजिनच्या राज्यात जास्त घेतली जायला लागली आहे याची नोंद आपण घ्यायला हवी”, असं जयंत पाटील म्हणाले.
“यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागेल तसतसं…”
“महाराष्ट्रात अहमदनगर, संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती या ठिकाणी हे सगळे प्रयोग करून झाले आहेत. हळूहळू यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागेल, तसं अशा प्रकारचं वागणं आणि महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करण्याचं काम भविष्यात होऊ शकेल. म्हणून आपण सतर्क राहायला हवं”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी उपस्थितांसह जनतेला सतर्कतेचा इशारा दिला.
“शरद पवारच भाजपाचा गेम करतील”, बच्चू कडूंचं सूचक विधान, मंत्रीपदावरही केलं भाष्य!
“मी काही शेरोशायरी करणारा माणूस नाही. पण एक चांगला शेर माझ्याकडे आलाय”, असं म्हणत जयंत पाटलांनी देशातील धार्मिक तणावाच्या वातावरणावर शायरी सादर केली.
नफरों का असर देखो…
जानवरों का बँटवारा हो गया…
गाय हिंदू और
बकरा मुसलमान हो गया…
ये पेड, ये पत्ते, ये शाखें
परेशान हो जाए…
अगर परिंदे भी
हिंदू और मुसलमान हो जाए…
जयंत पाटलांच्या या शायरीनंतर उपस्थितांकडून दाद देण्यात येत होती. तेव्हा शरद पवारांनीही त्यांच्याकडे बघून स्मितहास्य केल्यावर जयंत पाटलांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. “स्वभावाच्या विरोधी काही केलं की शरद पवार अशी प्रतिक्रिया देतात”, असं जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानावर व्यासपीठावर बसलेले शरद पवार व त्यांच्या शेजारी बसलेले जितेंद्र आव्हाड यांनीही दिलखुलास हसत दाद दिली.
“हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदू धोक्यात कसा?”
दरम्यान, ‘हिंदू खतरे में है’ या नारेबाजीवरही जयंत पाटलांनी टीका केली. “सत्ताधारी पक्षाचे आमदार महाराष्ट्रात हिंदू अस्मिता रॅली काढायला लागलेत. हिंदू खतरे में है म्हणतात. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणतात हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. मग या सरकारमध्ये हिंदू खरते में कसा आहे? हे त्यांनी सांगावं. आमच्या सरकारच्या काळात हिंदुत्ववाद्यांनी कधी मोर्चे काढले नव्हते”, असं जयंत पाटील म्हणाले.
“अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता…”, जयंत पाटलांचं विधान
“आपण थोडी काळजी घ्यायला हवी. आपण हिंदू, मुस्लीम, शीख असू.. तरी सर्वधर्म समभावानं महाराष्ट्रात आपण जगतो. ही व्यवस्था मोडली, तर महाराष्ट्र प्रगतीऐवजी अधोगतीला जाईल”, असा इशाराही जयंत पाटलांनी दिला.