सांगली : ईश्वरपूर नामांतर करताना यामध्ये उरूण नावाचा उल्लेख करावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी पाठिंबा दर्शवला. आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.

इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना नव्या नाव बदलात उरूणचा समावेश करावा, या मागणीसाठी पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कचेरीसमोर शहरातील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी भेट देऊन आमदार पाटील यांनी पाठिंबा देत असताना सांगितले, या साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रूपांतर होणार नाही, याची राज्य शासनाने खबरदारी घ्यावी. उरूण ही या शहराची खरी ओळख आणि अस्मिता आहे. शासनाने नव्या नाव बदलात उरूण समावेश करावा, ही या शहराची लोकभावना समजून घ्यावी.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.गेले चार दिवस उरूण या नावाचा समावेश नामांतरामध्ये करावा याा मागणीसाठी इस्लामपूरच्या कचेरी चौकात साखळी उपोषण सुरू असून या मागणीला राजकीय पाठिंबाही मिळत आहे.

दरम्यान, जेष्ठ नेते अण्णा डांगे यांनी ईश्‍वरपूर नामांतर करत असताना यामध्ये उरूण या नावाचा समावेश करावा अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उचित कार्यवाही करावी अशी शिफारस केली आहे.राज्य शासनाने लोकभावना लक्षात घेउन इस्लामपूरचे नामांतर ईश्‍वरपूर करण्याचा निर्णय पावसाळी अधिवेशनात जाहीर केला.

याबाबतचा प्रश्‍न आमदार सदाभाउ खोत यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. या प्रश्‍नावर उत्तर देत असताना संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूरचे नामांतर ईश्‍वरपूर करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असल्याचे जाहीर केला. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या नावात उरूणाा समावेश नसल्याने इस्लामपूरमध्ये सर्व पक्षिय कार्यकर्त्यांकडून उरूण या शब्दाचा समावेश करण्याची आग्रही मागणी होत आहे.