सांगली : दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही तर त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी भाजप आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला तर प्रत्युत्तर देताना आ. पडळकर यांनी सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही असा टोला लगावला. सांगलीतील लोकसभा आणि विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदार-आमदारांचा मिरज मध्ये ब्राह्मण समाजाच्यावतीने सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आ. पाटील आणि आ. पडळकर यांची एकाच व्यासपीठावरुन शाब्थिक खडाजंगी झाली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते खासदार , आमदारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी एकाच मंचावर आ.पाटील आणि आ. पडळकर यांच्यासह सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे , आमदार विश्वजीत कदम,आमदार सत्यजित देशमुख एकत्र आले होते. सांगली जिल्हा ब्राह्मण समाजाच्यावतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं.

अलीकडे वेगवेळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे. आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढत असेल तर दुसऱ्याला शिव्या देणं ही एक पद्धत सुरु झालीय. शिव्या देणाऱ्या त्या व्यक्तीला तो समाज डोक्यावर घेतो हे दुर्दैवानं आपण या देशात पाहतो आहोत. दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही तर त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते हे काही जणांच्या अजून लक्षात आलं नाही. दुसऱ्याना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही ही खूणगाठ सर्वांनी बांधली पाहिजे. ज्या यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये आपण गुण्या गोविंदाने राहत होतो त्या महाराष्ट्र मध्ये आज जाती जातीत द्वेष पसरायला लागला आहे हे दुर्दैवी आहे असे आ. पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याला प्रत्युत्तर देताना आ. पडळकर म्हणाले, महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीयवाद सुरू आहे. बोले तैसे चाले,त्याची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे सध्या होताना दिसत नाही. बोलणारे तसे बोलत नाहीत. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण या ऊक्तीप्रमाणे अनेक नेते सध्या महाराष्ट्रात मार्गदर्शन करतात. तसे मार्गदर्शन काही वेळापूर्वी या स्टेजवर आपण सर्वांनी ऐकलं असे म्हणत आ. पडळकर यांनी आ. पाटील यांना चिमटा काढला. केतकी चितळे जी भूमिका घेते त्या भूमिकेवर ती ठाम राहते. त्या केतकी चितळेचा आता आदर्श घ्यावा. नाहीतर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही असे म्हणत आ. पडळकर यांनी टीका केली.