राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटातील आमदार एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करत आहेत. पायताणावरून राजकारण झाल्यानंतर आता बरगड्या आणि कोथळ्यांपर्यंत राजकारण पोहोचलं आहे. ‘ज्याने कुणी कोल्हापुरात येऊन पायताणाची भाषा केली, त्याला प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का?’ असा सवाल धनंजय मुंडे यांनी काल (१० सप्टेंबर) कोल्हापुरात झालेल्या सभेत विचारला. त्यावर, जितेंद्र आव्हाड यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. शपथ घेतलेल्या आठ मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन शरद पवार जनतेशी संवाद साधत तिथली पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवारांची कोल्हापुरातील सभा गाजली होती. ‘राष्ट्रवादीतील गद्दारांना कोल्हापुरी पायताण दाखवा’, अशा भाषेत जितेंद्र आव्हाडांनी या सभेत हसन मुश्रीफ यांना टोला लगावला होता. शरद पवारांच्या या सभेनंतर अजित पवारांनीही कोल्हापुरात उत्तरसभा घेतली. अजित पवारांच्या या उत्तरसभेत “करकरीत कापशीचं कोल्हापुरी पायताण बसलं की कळेल”, असं जोरदार प्रत्युत्तर हसन मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांना दिलं होतं.

हेही वाचा >> Maratha Reservation : आजच्या सर्वपक्षीय बैठकीत काय होणार? फडणवीस म्हणाले, “जरांगेंच्या उपोषणामुळे…”

आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर हे प्रकरण इथंच थांबलं असेल असं सर्वांना वाटलं. परंतु, काल कोल्हापुरात झालेल्या सभेतही धनंजय मुंडेंनी जितेंद्र आव्हाडांवर चिखलफेक केली. ‘ज्याने कुणी कोल्हापुरात येऊन पायताणाची भाषा केली त्याला प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तर त्याच्या बरगड्या राहतील का?’ असा सवाल धनंजय मुंडे यांनी सभेत विचारला.

धनंजय मुंडेंच्या या विधाननंतर जितेंद्र आव्हाडांनीही आता चोख प्रत्युत्तर दिलं आहे. “कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवाबनवीकरून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो. हे कायम लक्षात ठेवा..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या या ट्वीटवर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागणार आहे. परंतु, पायताणापासून सुरू झालेलं राजकारण आता कोथळ्यांपर्यंत आल्याने राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.