केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आज सकाळी ही भेट घडवून आणली असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. माझी अमित शाहांची भेट झाली नसून मी गेली तीन दिवस शरद पवारांची भेट घेत आहे, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे.

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत जयंत पाटील कुठेही जाणार नसल्याचं म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्याबद्दल जाणूनबुजून संभ्रम निर्माण केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. जितेंद्र आव्हाडांनी आज जयंत पाटलांची भेट घेतली, त्यानंतर ट्वीट करत ही माहिती दिली. यावेळी आव्हाडांनी या भेटीचा काही सेकंदांचा व्हिडीओही शेअर केला.

हेही वाचा- “एक रुपयाही निधी देणार नाही”; अजित पवारांनी दिलेल्या चॅलेंजबाबत गिरीश महाजनांकडून मोठा खुलासा, म्हणाले…

जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल काहीजणांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते कोणाला तरी भेटून आले, ते मंत्री होणार आहेत, त्यांनी गावातून लोकांना बोलावलं, अशा प्रकारच्या बातम्या जाणूनबुजून पेरण्यात येत आहेत. ही पेरणी कशासाठी केली जातं आहे, हे आम्हाला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्याबरोबर माझं वैयक्तिक बोलणं झालं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, शरद पवारसाहेबांनी लढायचा इशारा दिला आहे आणि आता थांबायचं नाही.”

हेही वाचा- भाजपाने तुम्हाला ऑफर दिली आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “आम्ही लढणार आहोत, आम्ही लढणार आहोत, असं प्रत्येक नेत्यानं दररोज सांगावं, असं मला वाटत नाही. आम्ही मागेच सांगितलं आहे की, आम्ही पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत. त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचं ठरलंय, आम्ही लढणार म्हणजे लढणारच आहोत. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणं, ही काळाची गरज आहे. आम्ही जर असं केलं नाही तर, पुढची पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सत्ता येते आणि जाते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हाला कधीचं क्षमा करणार नाही,” असंही आमदार आव्हाड यांनी नमूद केलं.