राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं. राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीवरून विरोधकांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीचा आव्हाड यांनी समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील करोनाच्या मृत्यूदराचा हवाला देत ‘महाराष्ट्र धर्म पाळा’, असा टोला लगावला आहे.

राज्यातील करोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नाही. दिवसाला अडीच हजार ते साडेतीन हजाराच्या दरम्यान करोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. सरकारकडून करोनाचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न सुरू असून, विरोधकांकडून करोना बाधित वाढत्या रुग्णसंख्येवरून सरकारवर टीका केली जात आहे. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. “कोविड-१९ मृत्यूदर, गुजरात : ६.२५, महाराष्ट्र ३.७३
महाराष्ट्रात राहुन गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना ‘महाराष्ट्र पॅटर्न’ काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा,” असा टोला आव्हाड यांनी विरोधकांना लगावला.

आणखी वाचा- … ही महापालिका आणि राज्य सरकारची जीवघेणी बनवाबनवी : अतुल भातखळकर

“हा भलामोठा कट आहे”

राज्यातील विरोधकांवर करोना बाधित आकडेवारीवरून यापूर्वीही निशाणा साधला होता. “महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्युदर सांगा की!”, अशी टीका आव्हाड यांनी केली होती.