केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला़  राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली. मात्र राज्य सरकारने केलेली ही दरकपात म्हणजे सर्वसामान्यांनी थट्टा असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. फडणवीस यांनी केलेल्या या टीकेला आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

फडणवीस नेमकं काय म्हणालेले?
राज्य सरकारने केलेल्या दरकपातीसंदर्भात विचारलं असताना फडणवीस यांनी, “मला असं वाटतं की राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केलीय,” असं म्हटलंय. पुढे बोलताना, “दीड रुपये आणि दोन रुपयांनी इंधनाचे दर कमी करणं ही थट्टा आहे. कारण आपण बघितलं तर सगळ्या राज्यांनी आतापर्यंत सात रुपयांपासून १५ रुपयांपर्यंत दर कमी केलाय. महाराष्ट्र हे देशातील सर्वात समृद्ध राज्य आहे. देशाच्या जीडीपीच्या १५ टक्के जीडीपी एकट्या महाराष्ट्राचा आहे,” असं सांगत फडणवीस यांनी ही दरकपात अधिक हवी होती असं मत नोंदवलं आहे.

“केंद्रातल्या सरकारने २ लाख २० हजार कोटी रुपयांचं नुकसान स्वीकारलं आहे आणि आपण मात्र २५०० कोटींचं नुकसान होतंय म्हणून सांगतोय. खरं तर किमान केंद्र सरकारने या ठिकाणी जेवढी दरकपात केली त्याच्या दहा टक्के तरी कपात राज्य सरकारने करायला पाहिजे होती,” असं फडणवीस म्हणाले.

आव्हाडांचा टोला
“हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे नसे थोडके,” असा टोला आव्हाड यांनी फडणवीस यांच्या या टीकेवरुन लगावला. राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलवरील मुल्यवर्धीत करात कपात केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टिका केली. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

“देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. उशिरा का होईना पेट्रोल, डिझेल, गरीबांचे रोजगार याबद्दल त्यांना जाणीव होतेय,” अशा शब्दात चिमटाही जितेंद्र आव्हाड यांनी काढला. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी फडणवीसांवर हा निशाणा साधला.

भोंग्यांसंदर्भातील अल्टीमेटवरुनही निशाणा
“३ मे रोजी महाराष्ट्रात काय तरी होईल अशी व्यवस्था करण्यात आली. मात्र राज्यातील जनतेचे, या मातीचं कौतुक आहे. इथे महाराष्ट्र धर्म पाळला गेला. महाराष्ट्राची जी खरी ओळख आहे ती शिवरायांनी करुन दिली आहे ती शाहू – फुले – आंबेडकरांनी पुढे जपली. इथे धर्मांधतेला मान्यता मिळत नाही. जातीयवाद इथे जास्त काळ टिकत नाही. यांची जी इच्छा होती, जो प्लॅन होता तो महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांनी उधळून लावला. महाराष्ट्र धर्म पाळला गेला, असंही जितेंद्र आव्हाड यांनी भोंग्यांसंदर्भातील आंदोलनाबद्दल बोलताना म्हटलं.

“हा सापळा कुणी लावला कुणासाठी लावला यामध्ये आम्ही पडत नाही. सापळा लागला की नाही लागला तो त्यांनी बघावं. सापळा लावला होता की नाही हे त्यांनी बघावं. यांच्या आणि त्यांच्या नात्यातील तो सापळा होता,” अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली. “राजकारणात द्वेष असावा असं काही नसतं हा मॅच्युरिटीचा भाग आहे. लोकांमधील विश्वासार्हता चहा आणि जेवणाने कमी होत नाही. ती विश्वासाने मिळालेली असते, ती सहजासहजी संपत नाही,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओबीसी आरक्षणावरही केलं भाष्य
“ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हातात असते तर मी त्यांच्या शेजारी ठाण मांडून करुन घेतले असते. ओबीसी आरक्षण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वांवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय आहे त्यावर राजकारण करणे ही आपली प्रगल्भता नाही हे दर्शवते,” असा टोला आव्हाड यांनी लागवला. “प्रगल्भता असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल की हे सर्व सर्वोच्च न्यायालयात पेंडीग आहे. ज्या पद्धतीने बांठिया आयोग काम करतोय डाटा गोळा करतोय त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शंभर टक्के महाराष्ट्राच्या बाजुने लागेल व ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल,” असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.