विश्वास पवार, लोकसत्ता
वाई : साताऱ्यातील जोर आणि पाथरपुंज गावात राज्यातील यावर्षीचा आजवरचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. जोर (ता वाई) येथे एक जूनपासून तीन हजार ७११ मिलिमीटर,तर पाथरपुंज (ता. पाटण) येथे तीन हजार ३१६, कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरण येथे तीन हजार ३१२, सातारा जिल्ह्यातील वळवण येथे तीन हजार २७३, तर पुणे जिल्ह्यातील मुळशीतील दावडी ताम्हिणी येथे तीन हजार २०८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस एक जूनपासून २३ जुलैपर्यंत झालेला आहे. जल विज्ञान प्रकल्पाच्या संकेतस्थळावर व पाटबंधारे विभागच्या पूर नियंत्रण कक्षाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
जोर हे वाईच्या पश्चिमेला ३२ किलोमीटरवर, समुद्र सपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले गाव आहे. जोर येथे कृष्णेच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसावरच येथे बलकवडी धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची साठवण क्षमता चार टीएमसी आहे. या धरणातील पाणी पुढे कृष्णेतूनच धोम धरणात (ता. वाई) जमा होते. या भागात सर्वाधिक पाऊस हा महाबळेश्वरला पडतो. मात्र यंदा महाबळेश्वरपेक्षाही अधिक पाऊस जोर येथे पडला आहे. सध्या या पावसामुळे बलकवडी धरण जुलैच्या पंधरवडय़ातच भरले असून त्यातील पाणी आता पुढे धोम धरणात सोडण्यात आले आहे. धोम धरणातही यामुळे साठ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी २२ जुलै रोजी राज्यात जी अतिवृष्टी झाली होती, त्या वेळी या जोर खोऱ्यात एका दिवसात साडेनऊशे मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडलेले पाथरपुंज हे गाव पाटणपासून २८ किलोमीटर आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ६१० मीटर उंचीवर वसलेले आहे. या गावातही दरवर्षी मोठा पाऊस पडतो.
कृष्णा खोऱ्यात मोठा पाऊस झालेली गावे
’ जोर (ता. वाई) – ३७११
’ पाथरपुंज (ता. पाटण) – ३३१६
’ वळवण (ता. सातारा) – ३२७३
’ महाबळेश्वर- २८८५
’ नवजा (ता. पाटण) – २७५२
’ प्रतापगड (ता. महाबळेश्वर ) – २३०२
’ कोयनानगर (ता. पाटण) -२१६९
’ कोयना (धरण ) – २१५८
’ सांडवली (ता. सातारा ) – २०९८
’ कास (ता. सातारा)- २०६६
’ सोनत (ता. महाबळेश्वर)- १८४८
’ मोळेश्वरी (ता. जावळी)- १८१०
’ काती (ता. पाटण) – १७२०
’ बामणोली (ता. सातारा ) – १५५०
’ ठोसेघर (ता.सातारा) – १३६३
’ धोम-बलकवडी धरण- १२९६
आजवर राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे होत होती. मात्र मागील वर्षीपासून हा विक्रम महाबळेश्वर शेजारील जोर गावाच्या नावे नोंदला जाऊ लागला आहे. यावर्षीही आत्तापर्यंत (२३ जुलै) महाबळेश्वर येथे ३०९४ मिमी, तर जोर येथे ३७११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी व यावर्षीही महाबळेश्वर लगत जोर (ता. वाई) येथे पावसाचे प्रमाण वाढते आहे. – सुषमा पाटील चौधरी, तहसीलदार, महाबळेश्वर