राहाता : चित्रपटसृष्टीतील लोकांनी माझी प्रतिमा खराब करून ठेवली होती. ‘मणिकर्णिका – झाशीची राणी’ या चित्रपटामुळे माझा पुनर्जन्म झाला असल्याचे अभिनेत्री कंगना रणौत हिने शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. बारा वर्षांनंतर कंगनाने साई दरबारी हजेरी लावली. राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरेदेखील कंगनासोबत होती. या दोघींनीही साई मंदिरातील धूपारतीला हजेरी लावली.
साईबाबांच्या दर्शनानंतर अभिनेत्री कंगना रणौतने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की मणिकर्णिका या चित्रपटावर लहान मुले शाळेत कार्यक्रम करत असून, त्यात झाशीच्या राणीची भूमिका करत असल्याचे अनेक चित्रफिती माझ्यापर्यंत येत आहेत. त्यामुळे खूप चांगले वाटते. आपल्या वीरांगनांवर अशा प्रकारचे चित्रपट निर्माण होणे गरजेचे आहे. दिल्लीला ‘प्राईम मिनिस्टर म्युझिअम’मध्ये ‘लाईट अँड साँग शो’ असतो. त्यात वेगवेगळ्या वीरांगनांच्या कथा दाखवल्या आहेत. हा प्रयोग बघण्याची विनंती तिने केली. या वेळी तिने शिर्डीतील जुन्या भेटीच्या आठवणी जागविल्या. साईबाबा संस्थानकडून कंगना व उर्वशी ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
उर्वशी ठाकरे आणि कंगना एकत्र शिर्डीत
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कंगनाचे त्यांच्यासोबत खटके उडाले होते. त्यानंतर बराच वाद उफाळला होता. आता राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकदा त्यांनी एकाच व्यासपीठावर येणे पसंत केले आहे. त्यात आज थेट कंगनासोबत राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे शिर्डीत दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजकीय विषयांवर बोलण्यास या वेळी कंगनाने नकार दिला.
साईचरणी सोन्या-चांदीच्या वस्तू
दरम्यान हैदराबाद येथील रहिवासी साईभक्त डॉ. जी. हरीनाथ आणि जी. पुष्पलता यांनी १७ लाख ७३ हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत. या देणगीमध्ये १९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट, तसेच २८३ ग्रॅम वजनाचा चांदीचा अगरबत्ती स्टँडचा समावेश आहे. सोन्याचं ताट पारंपरिक डिझाइनसह आकर्षक रीतीने तयार करण्यात आले आहे, तर चांदीचा अगरबत्ती स्टँड नाजूक व सुंदर नक्षीने सजवलेला असून, त्यावर श्री साईबाबांची शिकवण ‘श्रद्धा आणि सबुरी’ या शब्दांचे सुंदर अक्षरात कोरीव काम करण्यात आले आहे.