समाजातील अनेक वर्गांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. सद्यस्थितीत पतंजलीचा फेसवॉश लावला नाही तर तोदेखील देशद्रोह ठरेल असा चिमटा कन्हैय्याकुमारने भाजपला काढला आहे. पंजाबमध्ये शुल्कवाढीला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याची आठवणही त्याने करुन दिली आहे.

गुरुवारी नागपूरमध्ये कन्हैय्याकुमारच्या बिहार से तिहार या हिंदी आत्मकथेच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याला कन्हैय्याकुमार उपस्थित होता. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा स्वरुपाचे संविधान तयार केले की ज्यात समाजातील प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य मिळेल. पण संविधानातील या स्वातंत्र्याचा लाभ अजूनही अनेक घटकांना मिळू शकलेला नाही याकडेही त्याने लक्ष वेधले. देशातील निरंकुश सत्तेवर आमचा आक्षेप आहे. लोकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास देशद्रोही ठरवले जाते. हल्ली पतंजली फेसवॉश लावला नाही तरी देशद्रोही ठरवले जाईल असा टोला त्याने लगावला.

दीक्षाभूमीला यायचे असल्याने मी या पुस्तक प्रकाशनासाठी आलो. नरेंद्र मोदीही नागपूरमध्ये येणार आहेत. उशिराने का होईना पण पंतप्रधानांनाही बाबासाहेबांनी आठवण झाली असे त्याने म्हटले आहे. ‘बिहार से तिहार’ हे पुस्तक म्हणजे माझे आत्मचरित्र नाही तर मी कारागृहात का गेलो हे सांगण्यासाठी ‘विद्यार्थी ते कारागृह’ असा यात्रा वृत्तांत आहे. माझ्या पुस्तकाने समाजात क्रांती होणार नाही. पण लोकांना बाबासाहेबांना अपेक्षित स्वातंत्र्याची जाण नक्कीच होईल, असे कन्हैयाकुमारने नमूद केले. जागोजागी स्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत. त्याचा प्रतिकार तुम्ही कधी करणार. जोपर्यंत सहन करू, तोपर्यंत हल्ले होणारच. विखुरलेला समाज संघटित झाला तर शक्ती दिसेल आणि कुणी हल्ला करण्याची हिंम्मत करणार नाही, असे प्रा. हरिभाऊ केदार यांनी सांगितले.