कराड : कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे आज मंगळवारी सकाळी ११ वाजता दीड फुटांनी उघडून कोयना नदीपात्रात ३,४०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तर, धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात मिसळत आहे. धरणातून एकूण हा ५ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू असताना, पाणलोटात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या दरवाजातून आणखी विसर्ग वाढून कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

कोयनेच्या दरवाजातून जुलैच्या मध्यावर जलविसर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विसर्गामुळे कृष्णा-कोयना नद्यांकाठच्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन शासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

सध्या कोयनेचा जलसाठा ७६.५२ टीएमसी (धरण क्षमतेच्या ७२.७० टक्के) असून, धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद १२,३८९ क्युसेकवरून थेट जवळपास दुप्पट वाढून २५,४७८ क्युसेक झाली आहे. आवक पाण्याचा विचार करून धरणातील जलविसर्गाचे नियोजन करण्यात येणार असल्याने धरणाच्या दरवाजातील विसर्ग वाढण्याची शक्यता यंत्रणेने व्यक्त केली आहे.

मान्सूनपूर्व व मोसमी पावसाच्या राहिलेल्या उच्चांकी प्रमाणामुळे कोयना धरणात झालेला भरघोस पाणीसाठा आणि पावसाळ्याचा उर्वरित दीर्घ कालावधी पाहता धरणसाठा नियंत्रित राखताना कृष्णा-कोयना नद्यांना पूर, महापूर येऊ नये यासाठीची खबरदारी म्हणून कोयनेच्या दरवाजातून हा जलविसर्ग करण्यात आला आहे. आवक पाण्याचा विचार करून, जलविसर्ग कमी-अधिक करण्यात येणार असल्याचे पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितले आहे.

कोयना पाणलोटात सलग पाच दिवस ओढ घेतलेला पाऊस काल सोमवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार सक्रिय झाला आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना पाणलोटात १४७.३३ मिमी (५.८० इंच) असा तुफान पाऊस, तर कोयना धरणात ३.५६ टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची आवक होऊन जलसाठा ७६.५२ टीएमसी (धरण क्षमतेच्या ७२.७० टक्के) झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोयना पाणलोटात आजवर सरासरी २ हजार ३०१.६६ मिमी (वार्षिक सरासरीच्या ४६.०३ टक्के) पाऊस होताना, धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद दुपटीने झेपावली आहे. पश्चिम घाटात बहुतांश महसूल मंडलात दमदार ते जोरदार पाऊस दिसतो आहे. त्यामुळे खरीप पेरण्या पुन्हा रखडणार असल्याने शेतकरी वर्ग चिंतेच्या गर्तेत लोटला गेला आहे.