कराड: पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. कराड व मलकापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम तर, रखडलेलेच आहे. अशा अपुऱ्या कामांमुळे पावसाळ्यात लोकांना प्रचंड त्रास सोसावा लागणार आहे. तरी महामार्गाच्या समस्यांबाबत मंगळवारी (दि. ६) सकाळी १० वाजता ‘मनसे’तर्फे ढेबेवाडी फाटा- मलकापूर येथे सेवारस्त्यावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ‘मनसे’चे तालुकाध्यक्ष दादासो शिंगण यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

शिंगण म्हणाले, महामार्गाचे काम करताना ‘काम कमी आणि गोंधळ जास्त’ घालणाऱ्या शासकीय यंत्रणेविरोधात हा रस्ता रोको आहे. दोन वर्षांपासून महामार्गाचे काम चालू आहे. तेंव्हापासून आवश्यक त्या नागरी सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. दोन वर्षे आपण केलेल्या आंदोलनामुळे मळाईदेवी पतसंस्था (नांदलापूर) ते कोल्हापूर नाक्या दरम्यान, पाच कोटींचे महामार्गाच्या दोन्ही सेवा रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम झाले. नागरिक, शालेय विद्यार्थी, वाहनधारक, व्यापारी व स्थानिकांना त्रास होवू नयेत, म्हणून सातत्याने आंदोलन करीत आहे. गेल्या महिनाभरापूर्वीच डी. पी. जैन कंपनीचे अनेक कर्मचारी वेतन आणि निर्वाह भत्ता न मिळाल्यामुळे निम्यातून काम सोडून गेल्यामुळे मोठी दुरावस्था झाली आहे.

रस्त्याकडील अनेक ठिकाणी गटारे उघडी असल्याने त्याचा मोठा धोका आहे. नव्याने येणारे अधिकारी, कर्मचारी कंत्राटी पद्धतीने येतात. त्यामुळे ते काम अर्ध्यावर सोडून जात आहेत. महामार्गावर ओढे, नाले बुजवल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताही मार्ग नाही. बाजूची गटारे पाच फुटांचीच असल्याने ती तुंबून पावसाळ्यात जिथे- तिथे तलावाची स्थिती होते. जुन्या गटारांवरील मोठी झाकणे अनेक ठिकाणी फुटली आहेत. तसेच त्यातील पाणी खड्ड्यात साचते. ते खड्डे दिसत नसल्याने लोकांच्या जीवालाही मोठा धोका असल्याचे शिंगण यांनी सांगितले.

उड्डाणपुलाखाली नवीन बांधण्यात आलेल्या गटारचे पाणी थेट नदीपात्रात सोडले आहे. ओढा किंवा पाणंद रस्त्याला ती गटारे जोडलेली नसल्याने स्थानिकांना त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्याची योग्य ती काळजी घ्यावी. सेवारस्त्याला जुनी गटारे आहेत, नवीन गटारे होणार आहे की नाहीत? याचा खुलासा व्हावा. महामार्गासंदर्भातील सर्व समस्या व प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी अशी ‘मनसे’ची मागणी असल्याचे दादासो शिंगण यांनी या वेळी बोलताना सांगितले.