कराड : शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करून ‘लमानी (विमुक्त जाती संवर्ग)’ या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळविल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, कराड तालुक्यातील एका गावातील एका व्यक्तीने शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करून मुलीला ‘लमानी (विमुक्त जाती संवर्ग)’ या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी अर्ज दाखल केला होता. कराड तहसील कार्यालय व प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या छाननीनंतर १५ सप्टेंबर २०२३ रोजी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले. मात्र, सातारा जिल्हा जात पडताळणी समितीकडे सदर प्रकरण पडताळणीदरम्यान, प्रस्तावा सोबतचा शाळा सोडल्याचा दाखला बनावट असल्याचे आढळून आले.
या प्रकरणात निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड यांनी कराड शहर पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, खोटे किंवा बनावट कागदपत्रे सादर करून जात प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महिलेची २६ लाखांची फसवणूक

ऑनलाईन काम करण्याच्या नावाखाली मलकापूर येथील एका महिलेला सुमारे २६ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रा. मलकापूर येथील एका ३२ वर्षीय महिलेने कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मलकापूर येथील फसवणूक झालेल्या महिलेशी संबंधित गुन्हा एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत घडला. गुन्हा दाखल झालेल्या महिलेने भ्रमणध्वनीवर फिर्यादी महिलेशी संपर्क साधून एका कंपनीचे सभासद होण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. त्यानंतर त्यांना एका समाज माध्यम समूहावर जोडून विविध आर्थिक व्यवहार करण्यास सांगितले. प्रत्येक उत्पादनावर किंमत लावलेली लिंक पाठवून पैसे भरण्यास सांगितले.

त्यानंतर त्या महिलेने समाज माध्यमावर मोठ्या रकमेचा नफा दाखवून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या खात्यांवर ऑनलाईन व एनईएफटीद्वारे पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी महिलेने वेळोवेळी एकूण २५ लाख ८२ हजार ३११ रुपये पाठवले. मात्र, ही रक्कम परत न करता ‘त्या’ महिलेने फिर्यादी महिलेशी संपर्क तोडला. या संपूर्ण व्यवहारादरम्यान, त्या सोबत तिचे अन्यही साथीदार असल्याचा संशय असून, याबाबत फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कराड शहर पोलीस करत आहेत.