कराड : जानुगडेवाडी (ता. पाटण) येथील मदनेवस्तीत राहत्या घरात रात्रीच्या सुमारास १२ वर्षीय शाळकरी मुलाला झोपेत सर्पदंश झाल्याने त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. ओंकार खंडोबा मदने असे मृत मुलाचे नाव असून, तो सहावीत शिकत होता. त्याच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

सर्पदंशाने मृत्यू होण्याची ढेबेवाडी विभागातील आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. अलीकडेच गुढे (ता. पाटण) येथील शशिकला रमेश पाटील या शेतकरी महिलेचा घराजवळ गंजीतून चारा काढताना घोणस सर्प चावल्याने मृत्यू झाला होता.

जानुगडेवाडी (ता. पाटण) येथील घटनेत घरातील सर्व जण झोपलेले असताना ओंकार मदने या मुलाला कानाजवळ सर्पाने चावा घेतला. मात्र, लगेच हा प्रकार लक्षात आला नाही. ओंकारला काही वेळाने अचानक त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला सुरुवातीला ढेबेवाडी येथील दवाखान्यात आणि प्रकृती अधिकच बिघडल्याने कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ढेबेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

उपाययोजनांची मागणी

पावसाळ्यात सर्प निघण्याचे प्रमाण अधिक असते. कृष्णा, कोयना नद्यांकाठीही मोठ्या प्रमाणात सर्प निघत आहेत. कराडच्या प्रीतिसंगम बागेत, तर नुकतीच घोणसची १५ पिले मिळून आली आहेत. पिले सापडल्याने प्रीतिसंगम बाग आठ-दहा दिवसांसाठी बंदही ठेवण्यात आली. यातील घोणस सर्पाच्या एका पिलाने बाग परिसरातील हातगाड्यासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या पायाला दंश केल्याने खळबळ उडाली. तत्काळ आणि अचूक उपचार झाल्याने ती महिला बचावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्पदंशाचे हे प्रकार एकापाठोपाठ घडतच असल्याने, विशेषतः सर्प मिळून येत असलेल्या आणि नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर तातडीने उपाययोजनांसह आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. तशी मागणीही सर्पदंशाच्या भयाने ग्रासलेल्या लोकांमधून होत आहे.