कराड : कराड अर्बन को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी समीर सुभाषराव जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा सातारा जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
या वेळी बोलताना, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले, ‘सन २०२२ पासून बँकेला सक्षम नेतृत्व देण्यासाठी मोठे बदल करीत १२ नवीन संचालकांचा समावेश आणि व्यवस्थापन मंडळात फेरबदल केले होते. त्याचाच पुढील टप्पा म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची जबाबदारी तरुण संचालकांकडे सोपविण्याचा निर्णय डॉ. सुभाष एरम, मी आणि सर्व संचालकांनी सार्वमताने घेतला. बँक व्यवसायाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून, लवकरच सहा हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण करेल.’
व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी म्हणाले, ‘संस्था ही वर्धिष्णू असते. संस्थेच्या व्यवस्थापनात बदलाची प्रक्रिया होतच असते. डॉ. सुभाष एरम यांचे २२ वर्षांतील योगदान बँकेच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. एरम कुटुंबीयांनी बँकेच्या वाटचालीत दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वजण कृतज्ञ आहोत.’
समीर जोशी म्हणाले, ‘कराड अर्बन’मध्ये कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुदृढता, सक्षमतेच्या आधारावर आतापर्यंतची वाटचाल राहिली आहे. बँकेने घालून दिलेली कारभारातील पारदर्शकता, राजकारणविरहित व नि:स्वार्थी कारभार या तत्त्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन यापुढे वाटचाल करणार आहे.’
शशांक पालकर म्हणाले, ‘प्रशंसनीय व वैभवशाली अशा बँकेच्या संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास दाखवला. तरी, बँकेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहीन.’
बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम म्हणाले, की सन २०२२ मधील संचालक मंडळात समाजकारणासह अर्थकारणात सक्रिय असणाऱ्या नवीन १२ जणांचा समावेश करण्यात आला. नवे नेतृत्व विकास आराखड्याचाच भाग असल्यानेच संचालक मंडळाने एकमताने नवीन तरुण अध्यक्ष समीर जोशी व उपाध्यक्ष शशांक पालकर यांची निवड केल्याचे डॉ. एरम यांनी सांगितले. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे, संचालक, व्यवस्थापन मंडळ उपस्थित होते.