अलिबाग : कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने यंदाचा यंग फॅमिली अवार्ड नुकताच प्रदान करण्यात आला. सलग दुसऱ्यांदा त्यांना अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने पुरस्काराने सन्मानित केले आहे.गेल्या वर्षी फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. एक हजार अमेरीकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी न्यूयॉर्क येथील नॅशनल आर्ट्स क्लब येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशातील प्रतिभावान चित्रकारांमध्ये पराग बोरसे यांचा समावेश होतो.२०२० मध्ये दैनिक लोकसत्ताच्या तरुण तेजांकीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, चीन, अमेरिका, सिंगापूर, दुबई येथे त्यांनी चित्रकारांसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत.लहानपणापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या पराग बोरसे यांनी मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्ट्स मधून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले आहे. २००३ पासून चित्रकला क्षेत्रात ते कार्यरत आहेत. व्यक्ती चित्र रेखाटणे ही त्यांची खासियत आहे. आज जागतिक पातळीवर स्वताची ओळख निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे.
जहांगीर आर्ट गॅलरीत २००८, २०१४ आणि २०१७ मध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. नेहरु सेंटर येथील कला दालनात २००८.२०११,२०१४, २०२४ अशी चार चित्र प्रदर्शने झाली आहेत. पुणे, दिल्ली, ओरीसा येथील चित्रप्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला आहे. चीन, सिंगापूर, अमेरिका, दुबई आणि थायलंड येथेही त्यांच्या व्यक्तीचित्र प्रदर्शित झाली आहेत. २०२० मध्ये अमेरीकेतील पेस्टल जरनल मार्फत दरवर्षी चित्रकारांची जागतिक स्पर्धा आयोजित केली जात असते.
या चित्रकला स्पर्धेत जगभरातील निवडक १०० चित्रकारांची चित्र निवडली जातात. यातील १९ चित्रांना पुरस्कार दिला जातो. यात पराग यांच्या व्यक्तीचित्राला पुरस्कार मिळाले आहेत.त्याच्या चित्रकलेची दखल घेऊ कर्नाटक सरकारने त्यांना युवा कुंचा कलाश्री पुरस्काराने २०१७ मध्ये सन्मानीत केले आहे, तर २००९ मध्ये पुण्यातील पंडीत सातवळेकर संस्थेने त्यांना पुरस्काराने सन्मानीत केले आहे. कर्जत येथील लाईट ऑफ लाईफ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ते आदिवासी वाड्यावरील मुलांना चित्रकलेची मोफत ट्रेनिंग देत असतात. अमेरिकेतील पेस्टल सोसायटीकडून दिला जाणारा पूरस्कार सलग दुसऱ्या वर्षी प्राप्त झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.